ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड या दोघांनी क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. IPL स्पर्धेत दोघेही काव्या मारनच्या मालकीच्या SRH संघाच्या ताफ्यातून खेळतात. या जोडीसाठी IPL फ्रँचायझी संघाने मोठी रक्कमही मोजल्याचे पाहायला मिळाले. आता ऑस्ट्रेलियन संघाची साथ सोडून IPL हंगामातील सर्व सामने खेळण्यासाठी IPL फ्रँयायझीकडून या दोघांना प्रत्येकी ५८-५८ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा एका वृत्तातून करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांना प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; मग काय घडलं?
ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह इंग्रजी वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, IPL मधील एका समूहानं ट्रॅविस हेड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी १०-१० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरची (जवळपास ५८ कोटी रुपये) ऑफर दिली होती. ऑस्ट्रेलियन संघाची साथ सोडून IPL स्पर्धेतील संपूर्ण हंगाम संघासोबत राहण्यासाठी ही ऑफर देण्यात आली होती. पण दोघांनीही आधी देश मग आयपीएल असा निर्णय घेत पैशांपेक्षा राष्ट्रीय संघाकडून खेळण्याला महत्त्व दिले, असा उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून मिळणाऱ्या पगाराच्या दुप्पटीनं IPL मधून करतात कमाई
पॅट कमिन्स हा IPL च्या इतिहासातील असा पहिला खेळाडू आहे ज्याच्यावर २० कोटींच्या घरात बोली लागली होती. २०२४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं ऑस्ट्रेलियन कॅप्टनसाठी तब्बल २०.५० कोटी एवढी रक्कम मोजली होती. २०२५ च्या मेगा लिलावात १८ कोटीसह SRH च्या संघानं त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. याशिवाय ट्रॅविस हेडसाठी या फ्रँचायझी संघाने १४ कोटी एवढी रक्कम मोजली आहे. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाकडून ही जोडी जवळपास वर्षाला ७.१५ कोटी रुपयांच्या घरात कमाई करते. याउलट फक्त दोन महिन्यात IPL मधून ते दुप्पट कमाई करतात.
IPL मध्ये एखादा फ्रँयायझी संघ खेळाडूला एवढी मोठी ऑफर देऊ शकतो का?
IPL मध्ये खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजली जाते. हे दोन्ही खेळाडूही महागड्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी असणाऱ्यांपैकी आहेत. पण प्रत्येकी ५८-५८ कोटी रुपयांची ऑफर म्हणजे खूपच फुगवून काहीतरी सांगण्यातला प्रकार आहे. कारण IPL च्या लिलावात संघाला १२० कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे ५०-६० कोटी रुपये एका खेळाडूवर मोजून संघ बांधणी करणं शक्यच नाही. अनेकदा खेळाडू राष्ट्रीय ड्युटी लक्षात घेऊन IPL अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतात. २०२५ च्या IPL हंगामात ICC टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमुळे ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPL मधून स्पर्धेआधी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.