विशाखापट्टणम : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवाचे कौतुक केले आहे. या दोघांचा अनुभव संघासाठी खूप मोलाचा आहे, पण त्याचबरोबर युवा खेळाडूंची कामगिरीही अविश्वसनीय राहिली, असे मत गंभीर यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले, तर रोहितने दोन अर्धशतके लगावत भारताला मालिका जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गंभीर यांनी आशा व्यक्त केली की हे दोन्ही दिग्गज खेळाडू त्यांचा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवतील. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने नऊ गड्यांनी विजय मिळविल्यानंतर गंभीर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘रोहित आणि विराट उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी अनेकवेळा सांगितले आहे की ते विश्वस्तरीय खेळाडू आहेत. ते या प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि ड्रेसिंग रूममध्ये त्यांचा अनुभव खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. ते दोघे तेच करत आहेत जे त्यांनी नेहमी केले आहे. आशा आहे की ते भविष्यातही अशीच कामगिरी करत राहतील.’’
युवा खेळाडूंना संधी
वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिल्याने, तसेच शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अनुपस्थित असल्याने, भारताला काही युवा खेळाडूंच्या कौशल्याची चाचपणी करण्याची संधी मिळाली. यातील हर्षित राणाच्या गोलंदाजीवर गंभीर आनंदी होते. गंभीर म्हणाले की, ‘‘आम्ही हर्षितसारख्या खेळाडूला अशाप्रकारे तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत जो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही योगदान देऊ शकेल. कारण अशाप्रकारे संघाला संतुलन साधावे लागेल. दोन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आम्हाला तीन चांगल्या वेगवान गोलंदाजांचीही गरज असेल. जर तो गोलंदाजी अष्टपैलू म्हणून स्वतःला सिद्ध करू शकला, तर ते आमच्यासाठी चांगले ठरेल.’’ याशिवाय, गंभीर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या कामगिरीनेही प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘या मालिकेत अर्शदीप, प्रसिद्ध आणि हर्षितची कामगिरी अविश्वसनीय राहिली. या तिघांनाही, विशेषतः वनडे क्रिकेटमध्ये फारसा अनुभव नाही. त्यांनी १५ हून कमी एकदिवसीय सामने खेळले आहेत. तरीसुद्धा त्यांची कामगिरी शानदार राहिली आहे.’’