इंदूर - कर्णधार रोहित शर्माचे तुफानी शतक, लोकेश राहुलची आक्रमक फलंदाजी आणि शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० मध्ये २० षटकांत ५ बाद २६० धावा चोपल्या. भारताने फटकावलेल्या २६० धावा ही टी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांघिक धावसंख्या ठरली आहे. मात्र शेवटच्या दोन षटकात वेगाने धावा जमवता न आल्याने ऑस्ट्रेलियाचा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा सांघिक विक्रम मोडण्याची भारताची संधी हुकली.
दुसऱ्या टी-20 लढतीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्या ३ षटकांत भारताच्या अवघ्या 18 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने मैदानावर वादळ आणले आणि या वादळात श्रीलंकेचे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडाले.
चौथ्या षटकात आपल्या फलंदाजीचा गिअर बदलणारा रोहित शर्मा लंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. चौकार षटकारांची मालिका लावणाऱ्या रोहितने संघाला नवव्याच षटकात शंभरीपार पोहोचवले. त्यादरम्यान रोहितने 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. यादरम्यान रोहित आणि राहुलने भारताला १६५ धावांची सलामी दिली. रोहित बाद झाल्यानंतर राहुल (८९), धोनी (२८) आणि हार्दिक पांड्या (१०) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अडीचशेपार मजल मारली.