Rohit Sharma's Hundred Sets Up Mumbai's Win vs Sikkim भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानं ७ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील एकदिवसीय सामना खेळताना दमदार शतक झळकावले. जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सिक्कीमच्या संघाने दिलेल्या २३७ धावासंख्येचा पाठलाग करताना रोहितनं अंगकृष्ण रघुवशींच्या साथीनं मुंबईच्या डावाची सुरुवात केली. २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यावर आपल्या धमाकेदार खेळ कायम ठेवत त्याने ६२ चेंडूत शतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१८ चौकार अन् ९ उत्तुंग षटकारांसह बहरलेली १५५ धावांची खेळी
एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कमबॅक सामन्यात ९४ चेंडूत १८ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारासह १५५ धावांची खेळी केली. तो नाबूाद राहून मुंबईला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण संघाला विजयासाठी ११ धावांची गरज असताना तो बाद झाला. तो बाद झाल्यावर मुंबईच्या संघाने ८ विकेट राखून ३१ व्या षटकातच विजय निश्चित केला.
रोहितच्या दमदार खेळीनंतर चाहत्याची मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरकडे खास विनंती
रोहित शर्माची दमदार फलंदाजी पाहिल्यावर चाहत्यांनी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या शार्दुल ठाकुरकडे खास डिमांड केल्याचेही पाहायला मिळाले. शार्दुल प्लीज पुढच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घे. आम्हाला रोहित शर्माचं द्विशतक पाहायचं आहे, अशी विनंती एका चाहत्याने एक्स अकाउंटरील ट्विटच्या माध्यमातून केली आहे. हीच भावना रोहितच्या अनेक चाहत्यांची आहे. त्यामुळेच हे ट्विट व्हायरलही होताना दिसत आहे.
रोहितचा लिस्ट ए क्रिकेटमधील रेकॉर्ड
रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात मुंबईकडून खेळताना आपले लिस्ट-ए कारकिर्दीतील ३७ वे शतक झळकावले. २०१८ नंतर प्रथमच विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्माने आपल्या अनुभवाची झलक दाखवली. आतापर्यंतच्या ३५१ लिस्ट-ए सामन्यांत माजी भारतीय कर्णधाराने १३,८८ पेक्षा अधिक धावा, ३७ शतके आणि ७४ अर्धशतके झळकावली आहेत.
गोलंदाजीत मुंबईकडून शार्दुल ठाकूरनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स
सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
आपला निर्णय सार्थ ठरवताना शार्दुल ठाकूरनं संघाकडून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तुषार देशपांडे, तनुष कोटीयन, शम्स मुल्लानी आणि मुशीर खान याने प्रत्येकी १-१ विकेटघेतली. सिक्कीमच्या संघाकडून अर्शित थापा नं ८७ चेंडूत केलेल्या ७९ धावांच्या खेळीशिवाय अन्य कुणाचाही फलंदाजीत निभाव लागला नाही. परिणामी सिक्कीमचा संघ निर्धारित ५० षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात फक्त २३६ धावांपर्यंतच मजल मारू शकला.