Join us  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 'या' विक्रमाला घातली गवसणी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:17 AM

Open in App
ठळक मुद्देमुंबईकर अजिंक्य राहणे (70) आणि रोहित शर्मा (71) या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला.

इंदूर - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे 294 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य भारताने आरामात पार केले. मुंबईकर अजिंक्य राहणे (70) आणि रोहित शर्मा (71) या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात रोहित शर्माने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. 

इंदूरच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 65 षटकार ठोकले आहेत. यापूर्वी ब्रेनडॉन मॅकल्लमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 61 षटकार लगावले होते. सचिन तेंडुलकरने 60, ख्रिस गेल 53 आणि इयॉन मॉर्गनने 52 षटकार खेचले आहेत. रोहितने रविवारच्या सामन्यात 71 धावांच्या खेळीत चार षटकार खेचले. 

याआधी वनडेमध्ये सर्वाधिक 264 धावा फटकावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. 2014 मध्ये इडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने 264 धावांची तुफानी खेळी केली होती. वनडेमध्ये दोनवेळा द्विशतक रचण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याचे हे विक्रम अजून कोणालाही मोडता आलेले नाहीत. 

 

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ६ बाद २९३ धावा उभारल्या. भारताने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

होळकर स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांनी १३९ धावांची जबरदस्त सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. 

कसोटीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे. याआधी दक्षिण आफ्रिका प्रथम क्रमांकावर होती. पण ऑस्ट्रेलियावरील विजयाबरोबर भारतानं आफ्रिकाला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत भारत सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर टी 20 मध्ये पाचव्या स्थानावर आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडूलकरबीसीसीआयआॅस्ट्रेलिया