Rohit Sharma Virat Kohli, ICC ODI Rankings: टीम इंडियाने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला जोरदार दणका दिला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा धडाकेबाज विजय मिळवला. या मालिकेत तीनही सामन्यांमध्ये भरपूर धावा झाल्या. मालिकेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारताचा रनमशिन विराट कोहली याने दोन शतके आणि एक नाबाद अर्धशतक झळकावले. दुसरीकडे रोहित शर्माने दोन डावात अर्धशतके झळकावली. या दोन्ही फलंदाजांची दमदार कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली. त्यामुळेच ताज्या ICC ODI क्रमवारीत रोहित अव्वलस्थानी कायम आहे तर विराट कोहली दोन स्थानांची झेप घेऊन दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.
रोहित नंबर १, विराट नंबर २
रोहित शर्माने पहिल्या सामन्यात ५७ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात तो स्वस्तात बाद झाला. पण तिसऱ्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने ७५ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या दोन अर्धशतकांच्या जोरावर त्याने क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले. दुसरीकडे विराट कोहलीने १३५ धावांची झंजावाती शतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यातही विराटने दमदार १०२ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. पण तो सामना भारताला गमवावा लागला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातही विराटने ६५ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळेच विराट दोन स्थानांची झेप घेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला.
फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल पाचव्या स्थानी कायम आहे. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर १०व्या स्थानी पोहोचला आहे. हंगामी कर्णधार केएल राहुल यानेही दोन स्थानांची बढती घेत १२२वे स्थान गाठले आहे.
कुलदीप यादवची तीन स्थानांची झेप
गोलंदाजांच्या क्रमवारीबाबत बोलायचे तर कुलदीप यादवने तीन स्थानाची बढती घेत तिसरे स्थान राखले आहे. टॉप१० मध्ये कुलदीपशिवाय इतर कोणताही भारतीय गोलंदाज नाही. भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने तब्बल २९ स्थानांची झेप घेत ६६वे स्थान पटकावले आहे.