Rohit Sharma No.1 in ODI Ranking: ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेच्या प्रभावी कामगिरीनंतर रोहित शर्मानेआयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. रोहित शर्माने एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला मागे टाकून हे स्थान मिळवले. यासह रोहित जगातील 'नंबर वन' वनडे फलंदाज बनणारा सर्वात वयस्क (Oldest No. 1 ODI Player) खेळाडू बनला आहे. ताज्या एकदिवसीय क्रमवारीत, रोहित शर्माने गिल आणि इब्राहिम झदरानला मागे टाकत ७८१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, शुभमन गिल पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाची धुलाई करत रोहित 'नंबर १'!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने इतर सर्व फलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही, परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने १०१ च्या सरासरीने २०२ धावा केल्या. त्याच्या कामगिरीमुळे तो जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडले.
रोहित शर्माचा विश्वविक्रम
रोहित शर्माने जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनून एक विश्वविक्रम रचला आहे. तो नंबर १ स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. रोहितने ३८ वर्षे १८२ दिवसांच्या वयात एकदिवसीय सामन्यांमध्ये नंबर १ रँकिंग मिळवले. रोहितने १८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता तो पहिल्यांदाच नंबर १ रँकिंगवर पोहोचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर १ रँकिंग मिळवणारा रोहित शर्मा हा फक्त पाचवा भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर हा अव्वल क्रमांक मिळवणारा पहिला फलंदाज होता. त्यानंतर धोनी नंबर १ झाला. मग विराट कोहली आणि शुभमन गिलने हा बहुमान मिळवला होता. त्यानंतर, आता रोहितने अव्वल क्रमांक पटकावला.