नवी दिल्ली - अनुभवी रोहित शर्मा ७ वर्षांनंतर विजय हजारे करडंक स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. त्याने २०१८ ला ही स्पर्धा खेळली होती. दरम्यान, रोहितने अद्याप ‘एमसीए’ला आपल्या उपलब्धतेबाबत कळविले नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
रोहित आणि कोहली यांनी मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत पुनरागमन केले होते. दुसरीकडे विराट कोहलीने अद्याप दिल्ली क्रिकेट संघटनेला स्पर्धा खेळण्याबाबत कळविलेले नाही. विराट २०१० ला विजय हजारे करंडकात खेळला होता. यंदा २४ डिसेंबरपासून विजय हजारे करंडक सामने सुरू होणार आहेत. निवड समिती प्रमुखांनी दोघांना स्पष्ट सांगून टाकले की, राष्ट्रीय संघात स्थान हवे असेल तर स्थानिक क्रिकेट खेळायलाच हवे. या स्पर्धेचे वेळापत्रक भारत-द. आफ्रिका यांच्यात ३ ते ९ डिसेंबरदरम्यान, तसेच ११ जानेवारीपासून होणाऱ्या भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेच्या दरम्यान निश्चित करण्यात आले आहे.
३८ वर्षांचा रोहित आणि ३७ वर्षांचा विराट मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत खेळले. सात महिन्यांनंतर दोघांनी वनडेत पुनरागमन केले. मालिकेतील अखेरच्या सामन्यात दोघांनी नाबाद १६८ धावांची भागीदारीही केली. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकताच दोन्ही दिग्गज या प्रकारातून निवृत्त झाले. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोघांनी कसोटीलादेखील अलविदा केले होते.
वृत्तानुसार, रोहित हा २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठीही उपलब्ध होऊ शकतो. तो सध्या इन्डोअर अकादमीत सराव करीत असून, विराट लंडनमध्ये कुटुंबीयांसोबत आहे.
२०१९ पासून नियमित कसोटी सामने खेळणारा रोहित दहा वर्षांनंतर २०२४-२५ ला मुंबईकडून रणजी सामना खेळला होता. कोहली देखील १२ वर्षांनंतर दिल्लीकडून रणजी सामना खेळला होता.