Join us

"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला

Rohit Sharma slams commentators and media: "हल्ली बातम्यांना 'मीठ-मसाला' लावून सांगण्यावर जास्त भर असतो", असेही रोहित म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:26 IST

Open in App

Rohit Sharma slams commentators and media: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी२० पाठोपाठ बुधवारी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने कसोटी कॅपचा फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत निवृत्ती जाहीर करणारा संदेश लिहिला.  चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले. पण हल्लीचे समालोचन आणि प्रसारमाध्यमांतून केले जाणारे वार्तांकन यावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?

"हल्ली तुम्हा लोकांचे लक्ष वाद निर्माण करण्यावर आणि बातम्यांना मसाला लावून प्रेझेंट करण्यावर असते. पत्रकारितेचा दर्जा खालावला आहे. पूर्वी, चर्चा क्रिकेटभोवती फिरत असे. पण आता सर्वकाही व्ह्यूज, लाईक्स मिळवण्यावर आणि अधिक लोकांना तुमचे लेख वाचायला लावण्यावर अवलंबून असते. खेळाबद्दल फार कमी लिहिले किंवा बोलले जाते. रणनीती, विश्लेषण याची काहीच चर्चा नसते," अशा शब्दांत रोहितने विमल कुमारच्या युट्युब शो मध्ये रोखठोक मत मांडले.

समालोचकांवर व्यक्त केली नाराजी

"जेव्हा सामना सुरू असतो तेव्हा आम्ही तो टीव्हीवर पाहतो. पण आजकाल समालोचक कसे बोलतात ते ऐका. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला जातो, तेव्हा आपल्याला त्यांचे समालोचन ऐकायला मिळते आणि तेव्हा कळते की गुणवत्तेत मोठा फरक असतो. आपल्याकडे समालोचन ते खूपच निराशाजनक असते. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की, हल्लीचे समालोचक एका खेळाडूला टार्गेट करून त्याच्याबद्दल बोलत राहतात. हे खूप निराशाजनक आहे," असेही रोहित म्हणाला.

खेळाडूंचा आदर करा!

"असे बरेच लोक आहेत ज्यांना खेळाबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यांना मीठ मसाला लावून सांगण्याची काहीच गरज नसते. ते खरे क्रिकेटप्रेमी आहेत. आजकाल असं म्हणतात की, चाहत्यांना 'मसाला' हवा आहे, परंतु असे लोक देखील आहेत ज्यांना खेळ समजून घ्यायचा असतो. उदाहरणार्थ, त्यांना जाणून घ्यायचे असते की एखाद्याचा फॉर्म का घसरला आहे, तो काय चूक करत आहे. त्यांना ती माहिती हवी असते. मग तुम्ही वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलू नका. तुमच्याकडे बोलण्यासाठी एक व्यासपीठ आहे, हातात माईक आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. खेळाडूंचा आदर करा,” तो पुढे म्हणाला.

खेळाडूंवर टीका करा पण...

"मला मान्य आहे की काही आमचा खेळ खराब होतो. गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर असतात आणि आमची कामगिरी खूप वाईट होते. त्यावेळी खेळाडू म्हणून आमच्या टीका व्हायलाच हवी. न्यूझीलंडविरूद्ध आम्ही घरच्या मैदानावर फारसा चांगला खेळ केला नाही. त्यासाठी आमच्यावर टीका केलीच पाहिजे. पण टीका करण्याची एक पद्धत असते. आपल्याकडे केली जाणारी टीका जाणीवपूर्वक केली जाते," असेही रोहितने खडसावले.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघमाध्यमे