रोहित नाईक : मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहितला एक नवी संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. आता त्याने केवळ संयम बाळगून खेळ करावा इतकीच इच्छा आहे. या जोरावर तो कसोटी सलामीवीर म्हणून नक्कीच यशस्वी होईल,’ असा विश्वास रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लाड यांच्या मार्गदर्शनाखालीच गोलंदाजाचा फलंदाज झालेला रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला खेळण्यास सज्ज झाला आहे. रोहितने शालेय कसोटी सामन्यांतही सलामीला फलंदाजी केली आहे. आता रोहितला मिळालेल्या नव्या संधीविषयी लाड यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय निवडकर्त्यांनी रोहितवर विश्वास ठेवला असून यात तो शंभर टक्के खरा उतरेल. ज्या प्रकारे तो विश्वचषक स्पर्धेत खेळला, तोच फॉर्म कसोटी सामन्यातही पाहायला मिळेल. मी विश्वचषक स्पर्धेच्या आधी अनेकांना सांगितले होते की, जर त्याने संयम बाळगून १०-१२ षटके खेळपट्टीवर तग धरला, तर तो अनेक सामन्यांत शतकी खेळी करेल आणि ते त्याने करुन दाखवले. या सर्व शतकी खेळीच्या सुरुवातीला रोहित शांतपणे खेळला आणि नंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे सुरुवातीला संयम बाळगून खेळपट्टीचा अंदाज घेणे आवश्यक आहे.’
‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहित सरळ बॅटने खेळतो आणि ही त्याच्यासाठी सर्वात सकारात्मक बाब आहे. त्यामुळे सलामीला खेळताना त्याला अडचण येईल असे दिसत नाही,’ असेही लाड यांनी म्हटले.