Rohit Sharma in Hospital : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या त्याच्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय बनला आहे. पण याचदरम्यान, त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका रुग्णालयातील रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हिटमॅनला इतक्या रात्री उशिरा रुग्णालयात जाण्याची गरज का पडली? असा साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे.
रोहित शर्मा रुग्णालयात पोहोचला, चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न
रोहित शर्मा रुग्णालयात का गेला होता, त्याची स्वत:ची तब्येत बिघडली आहे की, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडली आहे असे अनेक प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसत आहेत. रोहित शर्मा रात्री उशिरा मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात पोहोचला होता. रोहित शर्मा त्या रुग्णालयाबाहेर दिसला होता, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, रोहित त्याच्या गाडीतून खाली उतरून रुग्णालयाच्या आत जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तथापि, फुटेजमध्ये त्यापलीकडे काहीही दिसत नाही. पाहा व्हिडीओ-
रोहित रुग्णालयात, कारण काय?
रोहित रुग्णालयात का गेला हे स्पष्ट नसले तरी, त्याला रुग्णालयात जाताना पाहून त्याच्या चाहत्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. कारण रोहित शर्मा नुकताच बंगळुरूमध्ये होता, जिथे त्याने सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच एनसीएमध्ये त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी ही फिटनेस टेस्ट दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो आणि विराट कोहली टीम इंडियाचा भाग असू शकतात अशी बातमी आहे.
यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि विराट दोघेही टीम इंडियापासून दूर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी टी२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. पण ते अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. रोहितसोबत चाहत्यांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीला खेळताना पाहायला आवडेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी विराटने लंडनमध्ये त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली होती.