भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. रोहित शर्माच्या घोषणेनंतर इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळणार हे स्पष्ट झाले आहे. या शर्यतीत जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत आघाडीवर आहेत.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. 'भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहीन', असे रोहित शर्माने म्हटले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला, जो भारताने गमावला होता.
रोहित हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे, त्याने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४ हजार ३०१ धावा केल्या आहेत. रोहितने २४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यातील १२ सामने जिंकले आणि नऊ सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पहावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वीच त्याने कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम लावला.
रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याने १५ कसोटी सामन्यांमध्ये १०.८३ च्या सरासरीने १६४ धावा केल्या. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याने निराशाजनक कामगिरी केली. मुलाच्या जन्मामुळे तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळला नाही. अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित परतला. पण त्याने डावाची सुरुवात केली नाही. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण तो स्वस्तात माघारी परतला. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने फक्त १० धावा केल्या. त्यानंतर रोहित वरच्या फळीत परतला, पण तिथेही तो अपयशी ठरला. मेलबर्न कसोटीत तो नऊ धावांवर बाद झाला.
Web Title: Rohit Sharma: Rohit Sharma announces retirement from Test cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.