भारतीय संघ सध्या घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला रवाना होणार आहे. या दोन्ही स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. एका बाजूला भारत विक्रमी जेतेपदासह यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकणार का? हा मुद्दा चर्चेत असताना ही स्पर्धा रोहित शर्मासाठी शेवटची ठरणार का? हा मुद्दा चर्चेत आला आहे. यामागचं कारण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी बीसीसीआयने रोहित शर्माला भविष्यासंदर्भातील योजना काय? यासंदर्भात विचारणा केली आहे, असा दावा एका वृत्तातून करण्यात आला आहे. बीसीसीआय किंवा रोहित शर्मानं यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसी ट्रॉफी स्पर्धा अन् रोहितच भवितव्याचा फैसला
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापासून संघ बांधणीसंदर्भातील विचार सुरु केला आहे. वनडे शिवाय कसोटी संघातही बदलाचे प्रयोग करण्याचा बीसीसीयचा मूड दिसतोय. या प्रयोगासाठी बीसीसीआय नियमित कॅप्टन्सीचा पर्याय शोधत आहे. वृत्तानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधार रोहित शर्माला भविष्यातील योजनासंदर्भातील माहिती बीसीसीआयला कळवावी लागणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा रोहित शर्मासाठी अधिक महत्त्वपूर्ण झाली आहे.
बीसीसीआय भविष्यातील मजबूत संघ बांधणीला देणार पसंती
बीसीसीय निवडकर्ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनेसह कसोटी क्रिकेटमधील संक्रमण प्रक्रियासाठी उत्सुक आहेत. याचा अर्थ रोहित शर्माच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे. रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी तो ४० वर्षांचा असेल. त्यामुळे त्याच्या भविष्याचा फैसला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होऊ शकतो. याचा अर्थ तो या स्पर्धेनंतर निवृत्ती घेईल, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
रोहितचा फॉर्म अन् टीम इंडियाची कामगिरी या गोष्टीवरही असेल नजर
आता रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भविष्यातील योजनेसंदर्भात बीसीसीआयला कळवायचे आहे. याचा अर्थ आयसीसीची ही स्पर्धा त्याच्यासाठी गेम चेंजरही ठरू शकते. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माला आपल्या फलंदाजीतील जादू दाखवता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली कसोटीत टीम इंडियावर नामुष्की ओढावलीये. भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ आली. यामुळे रोहित आता रडारवर आहे. पण जर भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आणि रोहितनं या स्पर्धेत आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली तर त्याच्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी अन् करियअर आणखी काही वर्ष लांबवण्यासाठी आपली बाजू भक्कम मांडण्याची संधीही निर्माण होईल. पण या उलट घटलं तर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा खऱ्या ठरू शकतात.