सिडनी कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट' झाला याचा अर्थ रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसली. हिटमॅन रोहितनं विश्रांती घेतलीये की, त्याला डच्चू देण्यात आलाय? हा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. यासंदर्भात खरं काय अन् खोटं काय? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला असताना खुद्द रोहित शर्मानं यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
मी फक्त सिडनी कसोटी सामन्यातून संघाबाहेर झालोय. हा निर्णय म्हणजे मी निवृत्ती घेतलीये, असे नाही. मी कुठेही जाणार नाही, असे म्हणत रोहितनं निवृत्तीसंदर्भात रंगलेल्या चर्चेला पूर्ण विराम दिला. एवढेच नाही तर मी दोन मुलांचा बाप आहे, कधी थांबायचं, कॅप्टन्सी करायची का नाही? यासंदर्भातील निर्णय घेण्या इतकी समज माझ्यात आहे, असे म्हणत त्याने अप्रत्यक्षरित्या निवृतीच्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांनाही टोला मारला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावा होईनात म्हणून बाहेर बसलो
माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत. याचा अर्थ पुढच्या काही दिवसांत हा सिलसिला कायम राहिल असे नाही. मी कठोर परिश्रम करुनही अपयशी ठरलो. आमच्यासाठी बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा महत्त्वाची आहे. मालिका जिंकण शक्य नसलं तरी त्यांना मालिका जिंकू न देता इथल्या प्रेक्षकांची तोंड बंद करायची आहेत. यासाठी काही निर्णय घेणं महत्त्वाचे होते. प्लेइंग इलेव्हनमधून स्व:ताला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेणं कठीण होते. पण ते संघाच्या हितासाठी गरजेचे होते. हा निर्णयाबाबत कोच आणि संघ व्यवस्थापनाने पाठिंबा दिला, असे रोहित शर्मा म्हणाला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या खास कार्यक्रमात जतिन सप्रू आणि इरफान पठाण यांना त्याने खास मुलाखत दिली.
निवृतीच्या अफवा पसरवणाऱ्यांनाही हाणला टोला
लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले बाहेरचे लोक माझ्या निवृत्तीचा निर्णय घेणारे कोण? या धाटणीतला प्रश्नही रोहितच्या बोलण्यात दिसून आला. बाहेरच्या लोकांना जे बोलायचे ते बोलू देत. मी दोन मुलांचा बाप आहे. मला कोणता निर्णय कधी घ्यायचा ते कळतं. मी थांबणार नाही. मी कुठंही जाणार नाही, असे म्हणत त्याने प्रसारमाध्यमातून पसरणाऱ्या गोष्टी फक्त अफवा असल्याचे सांगत या बातम्या पेरणाऱ्यांना टोला मारला आहे.