Rohit Sharma Gautam Gambhir BCCI, IND vs ENG: भारतात सध्या सुरु असलेल्या IPL नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पाच कसोटी सामन्यांची प्रदीर्घ मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नुकताच BCCI ने संघ जाहीर केला आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे, त्याच्या जागी शुबमन गिलला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही एक विशिष्ट व्यक्ती टीम इंडियासोबत यापुढेही कायम असावी अशी खास विनंती रोहित शर्माने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडे केल्याचे समोर आले आहे. कोण आहे की व्यक्ती? काय आहे ती खास विनंती? सविस्तर जाणून घेऊया.
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरीही त्याने एका व्यक्तीसाठी गौतम गंभीरकडे शब्द टाकला असल्याचे क्रिकबझच्या अहवालातून समोर आले आहे. या व्यक्तीचे नाव आहे टी दिलीप. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कायम ठेवावे अशी विनंती रोहित शर्माने गौतम गंभीर आणि BCCI कडे केली असल्याचे अहवालात सांगितले आहे. टी दिलीप हा इतर सपोर्ट स्टाफसह टीम इंडियाचा भाग आहे. त्याचा करार मे महिन्यात संपुष्टात येत आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघाच्या खराब कामगिरीनंतर BCCI ने सपोर्ट स्टाफवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अभिषेक नायरसह सर्व सपोर्ट स्टाफला करार संपल्यावर मुक्त करण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. त्यातच टी दिलीप यालाही करारमुक्त केले जाणार होते. पण रोहितच्या विनंतीनंतर त्याची संघाच्या फिल्डिंग कोचपदी पुनर्नियुक्ती होईल, असे बोलले जात आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या वैयक्तिक खास विनंतीवरून गौतम गंभीरने टी दिलीप याच्या पुनर्नियुक्तीला मान्यता दिल्याचे समजते. त्याला सध्या तात्पुरते एका वर्षासाठी करारबद्ध केले जाणार आहे असेही अहवालात नमूद केले गेले आहे.