Rohit Sharma injured, IND vs NZ Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला आपला पुढचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल. किवी संघाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलू शकतो, कारण रोहित शर्मा कदाचित संघाबाहेर असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा फिट नाहीये. तो स्नायूंच्या दुखापतीमुळे नीट हालचालही करू शकत नाहीये. एवढेच नाही तर त्याने नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावादरम्यान थ्रो डाउन घेण्यासही त्याला जमले नाही. या सर्व गोष्टी पाहता, अशी भीती आहे की तो न्यूझीलंड विरुद्धच्या पुढील सामन्याला त्याला मुकावे लागू शकते. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे रोहित संघाबाहेर गेल्यास केवळ कर्णधारच नाही, सलामी जोडीही बदलावी लागणार आहे. जाणून घेऊया काय असतील पर्याय.
रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. पण, त्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले की तो पूर्णपणे ठीक आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा टीम इंडिया त्यांच्या पहिल्या सराव सत्रासाठी गेली तेव्हा मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना नेटमध्ये समस्या येत होत्या.
रोहित थ्रो डाउन घेऊ शकला नाही
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा कोणत्याही कठीण शारीरिक हालचालींमध्ये भाग घेताना दिसला नाही. संपूर्ण सराव सत्रात त्याने नेटमध्ये थ्रो डाउनही खेळले नाही. अहवालात पुढे म्हटले आहे की, रोहित शर्मा सराव सत्रात पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून आले नाही. पण तो निश्चितच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसह संघाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले.
फक्त कर्णधारच बदलणार नाही, तर सलामीची जोडीही बदलेल!
जर रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी बरा झाला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीमुळे केवळ टीम इंडियाचा कर्णधारच नाही तर संघाची सलामी जोडीही बदलेल. नियमानुसार, उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलला संघाचा कर्णधार केले जाईल आणि रोहितच्या जागी केएल राहुल सलामीला पाठवले जाऊ शकेल. अशा परिस्थितीत पाचव्या क्रमांकावर एखादा ज्यादा फलंदाज खेळवता येऊ शकेल.
शमी, गिलच्या खेळण्यावरही 'सस्पेन्स'
२६ फेब्रुवारी रोजी जेव्हा टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी पहिल्या सरावासाठी आली तेव्हा संघाचा उपकर्णधारही मैदानावर दिसला नाही. तो संघासोबत सरावालाही आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिलची तब्येत ठीक नव्हती. जर रोहित आणि गिल दोघेही संघाबाहेर झाले तर केएल राहुल किंवा हार्दिक पांड्याला हंगामी कर्णधार केले जाण्याची शक्यता आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शमीच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे. पण भारताचा संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहचला असल्याने संघ व्यवस्थापनावर फारसा दबाव नाही.