चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाचा कर्णधाराचा रणजी करंडक स्पर्धेतील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील लढतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं संघाची घोषणा केली असून यात रोहित शर्मासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड झालेल्या श्रेयस अय्यरसह यशस्वी जैस्वालचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तब्बल १० वर्षांनी रणजी मॅच खेळणार रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार मागील काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कॅप्टन असून त्याला बाकावर बसण्याची वेळ आली. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ५ डावात त्याने फक्त ३१ धावा काढल्या. भारतीय संघाच्या पराभवातील खलनायकांपैकी तो एक होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयने वरिष्ठ खेळआडूंसाठी कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, या नियमावर जोर दिला आहे. त्यामुळेच आता तब्बल १० वर्षांनी रोहित शर्मा रणजी मॅच खेळताना दिसणार आहे. याआधी रोहित शर्मानं २०१५ मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रोहितच्या खात्यात २९ शतके
रोहित शर्माची प्रथम श्रेणी क्रिकेटमधी कामगिरी जबरदस्त आहे. आतापर्यंत १२८ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ९२८७ धावा केल्या आहेत. यात २९ शतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३०९ ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
जम्मू-काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी असा आहे मुंबई संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी , सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, कर्ष कोठारी.