Rohit Sharma Fitness Test : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फिटनेस चाचण्यांसाठी बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे पोहोचला आहे. रोहितसोबतच, भारतीय कसोटी कर्णधार आणि टी२० उपकर्णधार शुभमन गिलदेखील आशिया कप २०२५ च्या तयारीआधी फिटनेस टेस्टसाठी बंगळुरूत दाखल झाला आहे. तसेच, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील प्री-सीझन फिटनेस चाचण्यांसाठी CoE येथे पोहोचला आहे. ९ सप्टेंबरपासून आशिया चषक सुरू होत आहे. त्याआधी विविध मालिका नजरेसमोर ठेवत सर्व खेळाडूंच्या फिटनेस टेस्ट केल्या जात आहेत.
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट
टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३८ वर्षीय रोहित शर्मा देखील फिटनेस चाचण्यांसाठी सीओई येथे पोहोचला आहे. ही प्रक्रिया रविवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकते. फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळणारा रोहित नवीन हंगाम कसा सुरू करतो हे पाहणे मनोरंजक असेल. रोहित ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकतो. या फिटनेस चाचणी दरम्यान, खेळाडूंना ब्रोंको चाचणी आणि यो-यो चाचणी द्यावी लागेल. वृत्तानुसार, खेळाडूंच्या पहिल्या दिवसाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या दिवसाच्या चाचण्या रविवारी घेतल्या जातील आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होतील.
गिलबाबत होती साशंकता
व्हायरल फिव्हरमुळे गिलला अलीकडेच दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये ईस्ट झोनविरुद्ध नॉर्थ झोनचे नेतृत्व करता आले नाही. तो चंदीगड येथील त्याच्या घरी या आजारातून बरा होत होता. आता पूर्णपणे बरा झाल्यानंतर बेंगळुरूला पोहोचला आहे. यावेळी खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणांहून दुबईला पोहोचतील, जे पूर्वीच्या परंपरेपेक्षा वेगळे आहे. पूर्वी संपूर्ण संघ मुंबईहून एकत्र प्रवास करत असे. पण आता गिल बेंगळुरूहून थेट दुबईला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आशिया कप खेळणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील चाचणीसाठी पोहोचला आहे. तो मुंबईतून दुबईला जाणार आहे.
'हे' खेळाडूही सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही पोहोचले...
गिल व्यतिरिक्त, यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा देखील स्पर्धेपूर्वीच्या तयारीसाठी सीओईला पोहोचला आहे. शार्दुल ठाकूर देखील सीओईला प्री-सीझन चाचण्यांसाठी गेला आहे. शार्दुल ठाकूर दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत पश्चिम विभागाचे नेतृत्व करेल, तर आशिया कपसाठी स्टँडबाय यादीत असलेले जैस्वाल आणि सुंदर हे देखील देशांतर्गत हंगामातील शेवटच्या चार सामन्यांमध्ये भाग घेतील.