Join us

Ind vs Eng: रोहित शर्माच्या 'या' टीप्स इशान किशनसाठी ठरल्या 'टर्निंग पॉईंट'

भारतीय संघात संधी मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहिलेल्या इशान किशन या युवा फलंदाजाला रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात अखेर संधी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:01 IST

Open in App

भारतीय संघात संधी मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहिलेल्या इशान किशन या युवा फलंदाजाला रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात अखेर संधी मिळाली. इशान किशननं संधीचं सोनं करत पहिल्याच सामन्यात खणखणीत अर्धशतक ठोकलं. भारतीय संघानं सामन्यात विजय प्राप्त केला आणि इशान किशन सामनावीर ठरला. पहिल्याच सामन्यात कोणताही दबाव न घेता साकारलेल्या धडाकेबाज खेळीमागे रोहित शर्मानं दिलेला सल्ला कामी आल्याचं इशानं किशननं सांगितलं. रोहितनं दिलेल्या आत्मविश्वासामुळे मनातली सगळी भीती निघून गेली असं  इशान किशन म्हणाला. (Rohit Sharma Gives Tips To Ishan Kishan For India vs England T20 Second Match)

इंग्लंडनं दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासमोर ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं केवळ तीन विकेट्स गमावून १७.५ षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण केलं. भारतीय संघासाठी इशान किशन यांनं ३२ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. इशान किशनसोबत कर्णधार विराट कोहलीनंही ४९ चेंडूत खणखणीत नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. कर्णधार कोहलीनं पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. 

रोहितनं केली इशानला मदतइशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. रोहित शर्मा मुंबईच्या संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचा उप-कर्णधार देखील आहे. इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आली नाही. पण संघाबाहेर बसून रोहितनं भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम केलं. खुद्द इशान किशननं याबाबत खुलासा केला. "एक क्रिकेटपटू म्हणून तुमच्या पाठीशी अनेक लोक असतात की जे तुम्हाला मदत करत असतात. रोहितनं सामना सुरू होण्याआधी मला सांगितलं होतं की तुला सलामीला फलंदाजी करायचीय आणि आयपीएलमध्ये ज्या मोकळेपणानं खेळतोस तसाच आजही खेळ. अर्थात ज्यावेळी मी मैदानात गेलो तेव्हा दबाव वाटणं सहाजिक आहे. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज पाहता आणि देशाची जर्सी परिधान करता तेव्हा तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करता. मी तेच केलं", असं इशान किशन म्हणाला.  

टॅग्स :इशान किशनभारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय