Rohit Sharma meets Dubai crown prince Hamdan bin Mohammed Al Maktoum: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला. १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, पण भारतीय संघाने सर्व सामने दुबईत खेळले. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, त्यानंतर भारताचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले. त्यानंतर नुकतेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या या खेळाडूंनी दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांची भेट घेतली. ते मुंबईत आले असताना, ICC चेअरमन जय शाह यांच्यासह या साऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू दुबईच्या युवराजांना भेटले. यावेळी संघाच्या वतीने दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांना चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी भेट देण्यात आली. हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही भेट म्हणजे दोन्ही देशांमधील सलोख्याचे संबंध आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे. यावेळी रोहित शर्माने दुबईमध्ये संघाला मिळालेल्या पाठिंब्याबाबत युवराजांचे आभार मानले. दुबईत खेळताना देशाबाहेर घरच्या चाहत्यांपासून दूर खेळतोय असे कधीच वाटले नाही. कारण यूएईमध्येही भारतीयांची संख्या मोठी असल्याने, प्रत्येक सामन्यात स्टेडियम टीम इंडियाच्या चाहत्यांनी खचाखच भरलेले असायचे, असे रोहित म्हणाला. रोहित व्यतिरिक्त हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनीही दुबईच्या युवराजांशी संवाद साधला. आयसीसी चेअरमन जय शाह देखील तिथे उपस्थित होते.
सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवने या बैठकीचे काही फोटो शेअर केले. त्याच्या कॅप्शनमध्ये सूर्याने लिहिले की, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जय शाह यांच्यासह दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांना भेटण्याचा मान मिळाला. आमच्या आवडत्या विषयावर जाणून घेणे आणि त्याबद्दल बोलणे खूप आनंददायी होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. यासह, टीम इंडियाने ICC विजेतेपद जिंकले. त्यासोबतच २००० साली झालेल्या अंतिम सामन्यातील पराभवाचा किवी संघाकडून बदला घेतला. भारताने यापूर्वी २००२ मध्ये (श्रीलंकेसह संयुक्त विजेता) आणि २०१३ मध्ये (इंग्लंडविरुद्ध) चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.