Join us

ICC Test batsman ranking : रोहित शर्मानं कमावली कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग; सर केलं आणखी एक विक्रमी शिखर!

भारतीय संघानं ओव्हल कसोटी जिंकून इतिहास रचला अन् इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:59 IST

Open in App

भारतीय संघानं ओव्हल कसोटी जिंकून इतिहास रचला अन् इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारतानं ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २१० धावांवर माघारी परतला. ५० वर्षांनतर ओव्हल कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाचे आता लक्ष पाचव्या कसोटीवर आहे. दरम्यान, या कसोटीनंतर रोहित शर्मानं फिनिक्स भरारी घेतली. दोन वर्षांत कसोटी ओपनर म्हणून रोहित यशस्वी ठरला आहे आणि त्याचा फायदा त्याला आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत झालेला पाहायला मिळत आहे.

India Playing XI: फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला मिळणार डच्चू अन् प्रमुख गोलंदाजाला विश्रांती?

चौथ्या कसोटीपूर्वी रोहितच्या खात्यात ७७३ रेटिंग पॉईंट्स होते आणि त्यानं विराट कोहलीला मागे ढकलून पाचवे स्थान पटकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित ३६८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ५६४ धावांसह आघाडीवर आहे. ओव्हल कसोटीतील शतकानंतर रोहितनं आयसीसी क्रमवारीत ४० गुणांची भर घातली आहे. तो पाचव्या स्थानावर कायम असला तरी त्याचे रेटिंग पॉईंट्स हे ८१३ इतके झाले आहेत. रोहितनं कारकिर्दीत प्रथमच ८००+ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. ( This is the first time Rohit Sharma has crossed 800 in rating in ICC Test batsman ranking ) 

 सुनील गावस्कर यांनी निवडला भारताचा ट्वेंटी-२० संघ; सलामीसाठी सुचवली नवीन जोडी

विराटनंही १७ रेटिंग पॉईंट्स जमा करताना ७८३ गुणांसह सहावे स्थान कायम राखले आहे. जो रूट ९०३ गुणांसह अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर केन विलियम्सन ( ९०१), स्टीव्ह स्मिथ ( ८९१) व मार्नस लाबुशेन ( ८७८) यांचा क्रमांक येतो. गोलंदाजांमध्ये भारताचा आर अश्विन ८३१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. जसप्रीत बुमराह एक स्थान वर सरकून ९व्या क्रमांकावर आला आहे. शार्दूल ठाकूर फलंदाजांच्या क्रमवारीत १३८व्या स्थानावरून ७९व्या क्रमांकावर आला आहे.  

 

टॅग्स :रोहित शर्माआयसीसीभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App