IND vs AUS Semi-Final: भारतीय संघानं दुबईच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीत ऐतिहासिक विजय नोंदवला. आयसीसी स्पर्धेच्या नॉक आउट मॅचमध्ये आतापर्यंत कधीही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियानं दिलेले आव्हान परतवून लावले नव्हते. पण दुबईत २६५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठली. या विजयासह रोहित शर्माच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जे विराट-धोनीला जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं
जे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना जमलं नाही ते रोहितनं आपल्या कॅप्टन्सीत करून दाखवलंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा भारतीय संघानं आयसीसी स्पर्धेची फायनल गाठली आहे. भारताच्या अन्य कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक फायनल खेळणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मासोबत रिकी पाँटिंगचंही नाव आहे. पण रोहित शर्मा असा एकमेव कॅप्टन आहे ज्याने आयसीसीच्या सर्व प्रकारात संघाला फायनलमध्ये नेलंय.
असा पराक्रम करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला कॅप्टन
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा भारतीय संघानं आयसीसी स्पर्धेची फायनल गाठली आहे. त्याच्याशिवाय रिकी पाँटिंग याने दोन वनडे वर्ल्ड कप आणि दोन आयसीसी स्पर्धेत संघाला फायनलमध्ये नेले होते. आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा (टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी) रेकॉर्ड नावे असलेल्या धोनीलाही हे जमलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २००७ मध्ये टी २० वर्ल्ड कप, २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन आयसीसी स्पर्धेत फायनल खेळली होती. पण या दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या पदरी पराभव पदरी पडला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची आयसीसी स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघानं रोहितच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळली. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने फायनल बाजी मारली होती.२०२३ मध्ये घरच्या मैदानात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही टीम इंडिया फायनल खेळली. यावेळीही आयसीसी ट्रॉफी आड ऑस्ट्रेलिया आली. पॅट कमिन्सच्या ताफ्यानं अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. आयसीसीच्या दोन स्पर्धेत फायनलमध्ये अपयशी ठरलेल्या टीम इंडियानं रोहितच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाचा डाव साधला. त्यानंतर आता आणखी एका आयसीसी ट्रॉफीच्या दिशेनं टीम इंडियाने पाऊल टाकले आहे.