Join us

Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले

आपल्यावरील टीकेनंतर सेहवागने आणखी एक ट्वीटदेखील केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:49 IST

Open in App

Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरूवातीच्या तीनही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबईचा ५ विकेट्सने पराभव केला. पॅट कमिन्सने या सामन्यात १४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. कमिन्सचे कौतुक करताना, वीरेंद्र सेहवागने एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये असे काही शब्द वापरण्यात आले होते, ज्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना ते ट्वीट खटकलं. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनीही सेहवागवर टीका केली. या टीकेनंतर सेहवागनेही एक ट्वीट केलं.

नक्की काय घडलं?

सेहवागने ट्विट केलं होतं- "(कोलकाताने मुंबईच्या) तोंडचा घास हिसकावला.. माफ करा, वडा पाव हिसकावून नेला. पॅट कमिन्सची खेळी ही अत्यंत क्लीन हिटिंग खेळींपैकी एक होती. १५ चेंडूत ५६... जीरा बत्ती." यावर ट्वीटवरून चाहत्यांना असं वाटलं की, सेहवागने रोहितला वडा पाव म्हटले आहे. त्यामुळे रोहितचे चाहते सेहवागवर भडकले. एक युजर म्हणाला- लोक रोहित शर्माला वडा पाव का म्हणत आहेत? असं म्हणणारे लोकं खूप वाईट आहेत, हल्ली लोक ट्विटरवर काहीही बोलतात. मी त्यांना सांगू इच्छितो की रोहित शर्माला सर्वात आधी वडा पाव वीरेंद्र सेहवागने म्हटलं होते. एका क्रीडा वाहिनीच्या लाईव्ह शो मध्ये, रोहित शर्मा वडा पावसारखा दिसतो, असं सेहवागच पहिल्यांदा म्हणाला होता. इतरही काही चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी सेहवागवर टीका केली.

त्यानंतर सेहवागने आपल्या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलं. चाहत्यांच्या या प्रकारावर सेहवागनेही प्रतिक्रियापर आणखी एक ट्वीट केलं. 'वडा पाव म्हणण्याचा अर्थ मुंबईशी संबंधित होता. वडापावसाठी प्रसिद्ध असलेले मुंबई हे शहर आहे. रोहितच्या चाहत्यांनो, मी रोहित शर्माचा तुमच्यापेक्षाही मोठा फॅन आहे. त्याच्या फलंदाजीचा मी मोठा चाहता आहे. त्यामुळे शांत व्हा", असं ट्वीट त्याने पहिल्या ट्वीटनंतर तासाभराने केलं.

दरम्यान, त्याच्या पहिल्या ट्वीटला ५०हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. तर दुसऱ्या ट्वीटला १५ हजारांहून कमी लाईक्स मिळाले.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्माविरेंद्र सेहवागमुंबई इंडियन्स
Open in App