अयाझ मेमन
टी२० क्रिकेटचे विश्वविजेते असलेल्या वेस्ट इंडिजकडून टी२० मालिकेत कडवी झुंज मिळण्याची अपेक्षा होती, पण भारतीयांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असा क्लीनस्वीप देत निर्विवाद वर्चस्व राखले. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेच्या तुलनेत टी२० मालिकेत भारताला विंडीजकडून कडवी टक्कर मिळण्याची अपेक्षा होती. पण रोहित शर्माच्या जबरदस्त नेतृत्वाखाली भारताने एकही सामना न गमावता बाजी मारली. यानिमित्ताने सादर केले आहे टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड...
रोहित शर्मा (१० पैकी ९ गुण)
तडाखेबंद शतकाशिवाय रोहितने संघाचे अप्रतिम नेतृत्व केले. सफेद चेंडूच्या क्रिकेटमधील त्याची दिग्गज खेळाडू म्हणून ओळख झाली असून एक कर्णधार म्हणूनही तो वेगाने प्रगती करत आहे.
शिखर धवन (१० पैकी ७.५)
तिसऱ्या सामन्यात केलेल्या ९२ धावांच्या भक्कम खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला क्लीनस्वीप दिला. यासह धवनने स्वत:ची प्रतिभाही कायम राखली. तरीही त्याला सातत्यपूर्ण कामगिरीवर मेहनत घ्यावी लागेल.
लोकेश राहुल (१० पैकी २.५)
तीन डावांत केवळ ५९ धावा करण्याची कामगिरी संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांसाठी तसेच स्वत: राहुलसाठी काहीच महत्त्वाची ठरणार नाही. राहुलने आपला फॉर्म गमावलेला नाही, पण त्याला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात यश आले नाही.
दिनेश कार्तिक
(१० पैकी ६)
कार्तिकला मर्यादित संधी मिळत आहे, पण त्याने या वेळची संधी साधताना अखेरच्या लढतीत नाबाद ३१ धावांची खेळी केली. या जोरावर भारताने सामना जिंकला. धोनीच्या अनुपस्थितीत कार्तिकच्या रूपाने भारताकडे यष्ट्यांच्या मागे व पुढे अनुभवी खेळाडू आहे.
भुवनेश्वर कुमार (१० पैकी ६)
एका सामन्यात स्वस्तात दोन बळी मिळवलेला भुवनेश्वर दुसºया सामन्यात महागडा ठरला. तरी तो अद्याप आपल्या सर्वोत्तम लयीमध्ये आला नाही. त्याचे हे अपयश फार वेळ राहणार नाही हीच अपेक्षा भारतीय संघ व्यवस्थापनाला असेल.
वॉशिंग्टन सुंदर (१० पैकी ६)
एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या सुंदरने मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात इकोनॉमी रेट नियंत्रित राखला. तसेच त्याने बळीही मिळवले. चांगल्या प्रकारे फलंदाजी करण्याच्या कौशल्याने संघातील त्याचे महत्त्व वाढते.
मनिष पांडे (१० पैकी ३)
मनिष कमी परंतु, महत्त्वपूर्ण खेळी खेळला. त्यामुळे ही मालिका त्याच्यासाठी अर्थहीन ठरली नाही. आपली छाप पाडण्यासाठी त्याला मिळणाºया सर्व संधी साधाव्या लागतील.
कृणाल पांड्या (१० पैकी ६.५)
कृणालने या मालिकेत अष्टपैलू खेळाडू म्हणून शानदार पदार्पण केले. त्याने या वेळी आपला आयपीएलमधील सर्व अनुभव पणास लावला. शानदार अष्टपैलू कौशल्यामुळे त्याला टी२० संघात नियमित स्थान मिळायला हवे.
खलील अहमद (१० पैकी ६.५)
पहिल्या सामन्यात खलीलने अप्रतिम खेळ केला. पण यानंतरच्या दोन सामन्यांतील सपाट खेळपट्ट्यांवर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. लेट स्विंग आणि दोन्ही बाजूला स्विंग करण्याच्या कौशल्याने तो विशेष ठरला.
कुलदीप यादव (१० पैकी ८)
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत कुलदीपची फिरकी आणि राँग वन चेंडू खेळण्यात विंडीजचे फलंदाज चकले. त्याने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली असून भविष्यात कुलदीप तिन्ही प्रकारांत वर्चस्व निर्माण करेल.
(लेखक लोकतमचे संपादकीय सल्लागार आहेत)