नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अपारंपरिक शैलीवर माजी दिग्गज सर रिचर्ड हॅडली यांनी भाष्य केले. अन्य वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहला जखमी होण्याचा अधिक धोका असल्याचे मत हॅडली  यांनी मांडले.
आयसीसीच्या प्रसिद्धिपत्रकात हॅडली म्हणाले, ‘बुमराह अनऑर्थोडॉक्स श्रेणीत फिट बसतो. त्याचा रनअपदेखील मोठा नाही. त्याचे तंत्र शानदार असून सर्वांना प्रभावित करणारे ठरले आहे.  चेंडू सोडताना बुमराह हा स्वत:च्या ताकदीचा आणि वेगाचा योग्य वापर करतो. परंतु क्रिकेटमध्ये दीर्घकाळ तो चालेल का, याचे मोजमाप करता येणार नाही. अन्य वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहला जखमा होण्याची अधिक शक्यता दिसते.’
‘बुमराह स्वत:च्या कठीण गोलंदाजी शैलीसह किती काळ खेळत राहील, याचा वेध घेणे कठीण आहे. त्याच्या खास गोलंदाजी शैलीमुळे अधिकवेळा जखमी होण्याचीदेखील भीती आहे. बुमराह आपल्या शरीरावर अधिक ताण आणि दडपण देत असल्याने काही जखमा गंभीर स्वरूपाच्या होऊ शकतात. जखमांमुळे त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ नये, अशी मी आशा बाळगतो. चेंडूतील गती, उसळी तसेच हवेत आणि खेळपट्टीवर चेंडू फिरविण्याच्या कौशल्यामुळे बुमराह फलंदाजांना संकटात टाकतो, हे पाहताना फार आनंद होतो,’ असे हॅडली यांनी म्हटले आहे.