भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याआधी ऋषभ पंतला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली.
ऋषभ पंतला भारत अ संघाच्या दुसऱ्या डावात तीन वेळा चेंडू लागला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. रिव्हर्स हुक मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या हेल्मेटला चेंडू लागल्याने पंतला प्रथम दुखापत झाली. त्यानंतर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या डाव्या हाताला चेंडू लागला. थोड्याच वेळात, एक चेंडू त्याच्या पोटात लागला. संघाचे फिजिओ तिन्ही वेळा मैदानावर आले. शेवटी त्याला मैदानात सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने रिटायर हर्ट होण्यापूर्वी २२ चेंडूत १७ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. त्याने याआधी पहिल्या डावात २४ धावा केल्या होत्या. पंतची दुखापत ही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. भारत अ संघाने त्यांच्या पहिल्या डावात २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव २२१ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे भारत अ संघाला पहिल्या डावाच्या आधारे ३४ धावांची आघाडी मिळाली.
भारत- द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका कधीपासून?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळतील.
इंडिया 'अ' ची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), हर्ष दुबे, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका 'अ' ची प्लेइंग इलेव्हन:
जॉर्डन हरमन, लेसेगो सेनोकवाने, टेम्बा बावुमा, झुबेर हमझा, मार्केस अकरमन (कर्णधार), कॉनर एस्टरह्युझेन (यष्टीरक्षक), टियान व्हॅन वुरेन, काइल सिमंड्स, प्रिनेलन सुब्रेन, त्शेपो मोरेकी आणि ओकुह.