Join us

कार्तिक नव्हे, तर जडेजामुळे ऋषभ पंत अडचणीत, बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सबा करीम यांचे मत

Rishabh Pant: रवींद्र जडेजाला जोपर्यंत ‘फ्लोटर’ म्हणून वापरले जाईल, तोपर्यंत टी-२० संघात ऋषभ पंतचे स्थान पक्के मानले जाणार नाही, असे मत माजी निवडकर्ते सबा करीम यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 09:40 IST

Open in App

नवी दिल्ली : रवींद्र जडेजा हा चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यास सक्षम फलंदाज बनला. परिस्थितीनुसार तो तळाच्या स्थानावर येत वेगाने धावादेखील काढू शकतो.  जडेजाला जोपर्यंत ‘फ्लोटर’ म्हणून वापरले जाईल, तोपर्यंत टी-२० संघात ऋषभ पंतचे स्थान पक्के मानले जाणार नाही, असे मत माजी निवडकर्ते सबा करीम यांनी व्यक्त केले.

भारताने पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी क्रमात केवळ एक डावखुरा खेळाडू निवडला. दुसरीकडे वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिक याला फिनिशर आणि यष्टिरक्षक अशी दुहेरी जबाबदारी सोपविली. एका शोमध्ये सबा म्हणाले, ‘माझ्या मते आशिया चषकात संघ व्यवस्थापनाने दिनेश कार्तिकला खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे रवींद्र जडेजा याला ‘फ्लोटर’ म्हणून वापरण्यात आले. मागच्या सामन्यात तो चौथ्या स्थानावर खेळला. सामन्यागणिक जडेजा नव्या पद्धतीने खेळताना दिसेल. डावखुरा फलंदाज या नात्याने तो चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फटकेबाजी करू शकतो. तळाच्या स्थानावरदेखील तो वेगवान धावा काढण्यास फिट असल्याने अंतिम एकादशमध्ये सध्या तरी पंतला जागा नाही.’

फलंदाजीला महत्त्व द्यायचे झाल्यास पंतला अंतिम एकादशमध्ये स्थान दिले तर दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागेल. ऋषभ पंत ‘एक्स फॅक्टर’ असून, तो तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून मॅचविनर ठरू शकतो. 

मग आपण ऋषभसारख्या खेळाडूंना बाहेर कसे बसवू शकता? पंत अंतिम एकादशमध्ये नसल्याचे मला स्वत:ला आश्चर्य वाटले. मी तर दिनेश कार्तिकऐवजी ऋषभला संघात स्थान देण्याच्या मताचा आहे. कार्तिकच्या तुलनेत ऋषभ अधिक उपयुक्त ठरू शकतो, या मतावर मी आजही ठाम असल्याचे करीम यांनी सांगितले.

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघरवींद्र जडेजा
Open in App