Rishabh Pant Sixer Viral Video, IND vs AUS 5th Test Sydney: बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फारशी चांगली सुरुवात केली नाही. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती दिल्याने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला. पण फलंदाजीच्या पद्धतीत फारसा फरक पडला नाही. फलंदाजांची हाराकिरी सुरूच असल्याने शंभर धावांच्या आतच भारताने ४ विकेट्स गमावल्या. केवळ रिषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसला. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या ब्यू विबस्टर याला पुढे निघून षटकार खेचला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो चेंडू काढण्यासाठी चक्क शिडीचा वापर करावा लागला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल (१०), केएल राहुल (४) आणि शुबमन गिल (२०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. ३ बाद ५७ या धावसंख्येवर भारत असताना रिषभ पंत मैदानात आला. त्याने विराट कोहलीसह चांगली झुंज दिली. भारत ७२ धावांवर असताना, विराट कोहलीदेखील १७ धावांवर बाद झाला. पण पंतने चांगली फलंदाजी केली. काही वेळा बचावात्मक खेळ तर काही वेळा आक्रमक फटकेबाजी असा समतोल साधत तो खेळत होता. पदार्पणवीर विबस्टर गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी पंतने त्याच्या चेंडूवर पुढे येऊन अप्रतिम षटकार खेचला. चेंडू सरळ रेषेत साईड स्क्रीनवर आदळला आणि विचित्र ठिकाणी अडकून पडला. अखेर शिडी लावून तो चेंडू काढण्याची वेळ ग्राऊंड स्टाफवर आली. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन क्रिकेट मीडियाने पोस्ट केला असून तो चांगलाच चर्चेत आहे. पाहा व्हिडीओ-
त्यानंतर रिषभ पंत ९८ चेंडूत ४० धावांवर बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यापाठोपाठ नितीश रेड्डीदेखील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाचे ६ गडी अवघ्या १२० धावांवर बाद झाले.
दरम्यान, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला संघाबाहेर ठेवण्याचा कठोर निर्णय साऱ्यांनाच थक्क करणारा ठरला. काल हेड कोच गौतम गंभीर याने रोहितला वगळण्याचे संकेत दिले होते. टॉसच्या वेळी रोहितच्या समावेशाबाबत कळेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर असेही वृत्त आले होते की, रोहितने स्वत:च सामन्यातून माघार घेत विश्रांती देण्याची मागणी गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक अजित आगरकर या दोघांकडे केली आणि दोघांनी त्यास मान्यता दिली. पण एखाद्या संघाच्या नियमित कर्णधाराच संघाबाहेर बसण्याची वेळ येणे ही क्रिकेटवर्तुळात नक्कीच चर्चेची गोष्ट ठरते. रोहितने गेल्या ३ कसोटीतील ५ डावांत ३१ धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती देण्यात आली असावी, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
Web Title: Rishabh Pant hits a six so big the ground staff needed a ladder to retrieve it Video viral on social media ind vs Aus trending
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.