Join us

युवा खेळाडूंचा उदय ही टीम इंडियातील मोठी घडामोड

पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यातील पराभवांचे प्रमुख कारण सुरुवातीच्या सहा षटकांत तीन फलंदाज गमावणे हे होते. पुन्हा फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर मात्र भारतीय संघाचा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:10 IST

Open in App

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - भारत-इंग्लंड टी-२० मालिका  आधीच रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. शनिवारी होणारी अेखरची लढत याला अपवाद नसेल. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा लाभ घेत भारताने आधीच्या सामन्याची पुनरावृत्ती करीत क्रमवारीत दुसरे स्थान पटकविले, गुरुवारी चांगली धावसंख्या उभारल्यानंतर हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी या धावांचा यशस्वी बचाव केला.पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यातील पराभवांचे प्रमुख कारण सुरुवातीच्या सहा षटकांत तीन फलंदाज गमावणे हे होते. पुन्हा फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर मात्र भारतीय संघाचा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक होता. उच्च दर्जाच्या इंग्लिश माऱ्यापुढे संयमी सुरुवात केली आणि नंतर चेंडूवर नजर स्थिरावताच फटकेबाजीही केली. सूर्यकुमार यादव सामन्याचा हिरो ठरला. आंतरराष्ट्रीय पदार्पणात त्याने दर्जेदार फटकेबाजी केली. या क्षणासाठी त्याला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागली होती, पण संधी मिळताच जोफ्रा आर्चरला पहिल्या चेंडूवर प्रेक्षणीय हूकचा फटका मारून षटकार खेचला. आदिल राशिदच्या गुगलीवर एक्स्ट्रा कव्हरवर मारलेला ड्राईव्हचा फटका देखील ‘क्लासिक’ होता. यातून त्याच्या खेळातील ताकद आणि आत्मविश्वास जाणवला. गेल्या काही महिन्यात नव्या चेहऱ्यांनी दाखविलेला धडाका ही भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण घडामोड म्हणावी लागेल. सूर्यकुमारची कालची खेळी त्यात भर घालणारी ठरली.  मधल्या फळीत आलेला श्रेयस अय्यर याची खेळी विशेष म्हणावी लागेल. राष्ट्रीय संघात नेहमी आवडीच्या स्थानावर फलंदाजी करता येणार नाही, याची जाणीव दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूला आहे. त्यामुळेच स्वत:च्या क्षमतेनुसार खेळून त्याने संघाला सुस्थितीत आणले. गोलंदाजीत भुवनेश्वरने पहिले षटक निर्धाव टाकले, तर दुसऱ्या षटकांत जोस बटलरचा अडथळा दूर केला. मात्र जेसन रॉय, जॉनी बेयरेस्टॉ आणि बेन स्टोक्स यांनी धडाका कायम ठेवून रंगत वाढविली होती. त्याचवेळी शार्दुलने धोकादायक स्टोक्स आणि अनुभवी मॉर्गन यांना पाठोपाठ बाद करीत पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्यास मदत केली. (गेमप्लान)

हार्दिकचे कौतुक हार्दिकने चार षटकांत केवळ १६ धावा देत दोन बळी घेतले. इंग्लंडला षटकामागे ९ धावांची गरज असताना पाठीच्या शस्त्रक्रियेतून परतलेल्या हार्दिकने टिच्चून मारा केला. गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरुण आता आश्वस्त झाले असावेत. मला वाटते की भारताने गोलंदाजीत आणखी एक पर्याय तयार ठेवायला हवा.

झेलबाद चर्चेचा विषय सूर्यकुमारला झेलबाद देणे चर्चेचा विषय ठरला आहे. अशा निर्णयांवर फेरविचार होण्याची गरज असल्याचे माझे मत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना एखादा मैदानी पंच जवळपास ७० यार्ड दूर असलेल्या अशा झेलबादच्या निर्णयावर झटपट कसा काय निर्णय घेऊ शकतो? 

टॅग्स :भारतक्रिकेट सट्टेबाजी