भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यांत अपेक्षित थरार पाहायला मिळत नसताना दुसरीकडे इंग्लंडमध्येच ट्वेंटी-२०त धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली. ब्लास्ट ट्वेंटी-२० लीगमध्ये समरसेट विरुद्ध डर्बीशायर यांच्यातल्या सामन्यात १८ षटकारांची आतषबाजी झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच संघाने हे सर्व सिक्स मारले. समरसेट क्लबने ट्वेंटी-२० सामन्यात ५ बाद २६५ धावांचा डोंगर उभा केला आणि १९१ धावांनी हा सामना जिंकला. ब्लास्ट ट्वेंटी-२० लीगमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली अन् लीगमधील सर्वात मोठा विजयही ठरला. या सामन्यात स्टार ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा ३२ वर्षीय रिली रोसोवू ( Rilee Rossouw ) त्याने ९३ धावांची अविश्वसनीय खेळी खेळली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या समरसेटचा सलामीवीर विल स्मीद १८ धावांवर माघारी परतला. पण, रोसोवू व टॉम बँटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बँटन ४१ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावांवर माघारी परतला. कर्णधार टॉम अॅबेलने नाबाद २२ धावा केल्या. रोसोवू सुसाट सुटला होता त्याने एका षटकात 6,6,4,6,6,6 अशा ३४ धावा कुटल्या. त्याने ३६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर समरसेटने ५ बाद २६५ धावांचा डोंगर उभा केला. टॉम लॅमोन्बीने ३१ धावा केल्या.
२०१४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोसोवूला करारबद्ध केले होते, परंतु त्याला फार संधी मिळाली नाही. प्रत्युत्तरात डर्बीशायरचा संघ ७४ धावांत तंबूत परतला. पीटर सीडल व बेन ग्रीन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. लुईस ग्रेगरीने दोन, तर क्रेग ओव्हर्टनने १ विकेट घेतली.