मेलबर्न : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने २००३ च्या विश्वचषकाच्या आठवणी जागवल्या आहेत. अंतिम सामन्यात त्याने भारताविरोधात १४० धावांची खेळी केली होती. त्याने अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर राहत ३०० धावा करण्यापेक्षा भारताच्या आक्रमणावर हल्लाबोल केला होता.
भारताला या सामन्यात १२५ धावांनी पराभूत करत आॅस्ट्रेलियाने विश्वचषक आपल्याकडेच ठेवला होता. रविवारी त्या सामन्याला १७ वर्षे पूर्ण झाली. पाँटिंगने नाबाद १४० धावा केल्या होत्या. त्याच जोरावर आॅस्ट्रेलियाने ५० षटकांत २ बाद ३५९ धावा केल्या.
पाँटिंगने सांगितले की, दुसऱ्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जेव्हा १५ षटके शिल्लक होती. तेव्हा आम्ही दोन गडी गमावले. तेव्हा मी १२ व्या खेळाडूंला सांगितले की, ड्रेसिंगरुमध्ये दुसºया फलंदाजाला तयार रहायला सांग कारण मी आताच आक्रमक फलंदाजी करणार आहे.’
रिकी पाँटिंग याने एका वेबसाईटला सांगितले की, जर ही योजना कामात आली तर आम्ही खूप मोठी धावसंख्या उभारू शकणार होतो. मी अखेरपर्यंत भारतीय गोलंदाजी आक्रमणाच्या विरोधात ३०० धाव करून आनंदी होणार नाही. मला आणखी पुढे जायचे होते. जर मी वेगाने धावा केल्या तर हे शक्य होते.’
त्याने पुढे सांगितले की, माझ्यानंतर डॅरेन लेहमन, मायकेल बेव्हन, अँड्र्यु सायमंड्स या सारखे फलंदाज होते. त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास होता.’
या सामन्यात भारतीय संघाकडून फक्त हरभजन सिंग यालाच दोन गडी बाद करता आले होते. त्याने अंतिम सामन्यात अॅडम गिलख्रिस्ट आणि नंतर मॅथ्यु हेडन यांना बाद केले होते. या दोघांनी आॅस्ट्रेलियाला १०५ धावांची सलामी दिली होती.
भारताकडून वीरेंद्र सेहवाग ८४ धावा आणि राहुल द्रविड ४७ धावा यांच्याशिवाय इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, अँड्र्यु सायमंड्स या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली होती. सचिन आणि गांगुलीदेखील या सामन्यात अपयशी ठरले होते. (वृत्तसंस्था)
मार्टिनसोबत २३४ धावांची नाबाद भागीदारी
- बोटाला दुखापत झाल्यानंतर देखील डॅमियन मार्टिनला खेळण्याबद्दल कसे विचारले, याबद्दल बोलताना पाँटिंगने सांगितले की,‘ मी मार्टिनला म्हटले की, माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग की तू खेळू शकतो की नाही. त्याने अंतिम सामन्यात खेळावे ही माझी इच्छा होती. तो शानदार खेळाडू आणि स्पिन विरोधात अप्रतिम फलंदाज होता.’
- मार्टिनने या सामन्यात ८८ धावांची खेळी केली. त्याने कर्णधारासोबत २३४ धावांची नाबाद भागीदारी केली होती. पाँटिंगने यावेळी टिष्ट्वटरवर त्या सामन्यात वापरलेल्या बॅटचे चित्र पोस्ट केले आहे.