सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. कामगिरी चांगली होत नसल्यामुळे स्वत: बाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याची गोष्टही रोहित शर्मानं स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत शेअर केली. एवढेच नाही तर हा निर्णय घेतला याचा अर्थ मी निवृत्त होतोय, असा नाही, हे स्पष्ट करत हिटमॅननं निवृत्तीच्या पसरणाऱ्या अफवा खोट्या ठरवल्या. आता त्याच्या या मुलाखतीवर माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समीक्षक अशी ओळख असलेल्या संजय मांजरेकर याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीरला श्रेय मिळताना दिसले म्हणून रोहित पुढे आला
सिडनी कसोटी सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाल्यावर त्याचे श्रेय कोच गौतम गंभीरला मिळत होते. त्यामुळेच रोहित शर्मा याने मॅच दरम्यान मुलाखत देत प्लेइंग इलेव्हनमधून आउट होण्यासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण दिले, असे मत संजय माजरेकरनं मांडले आहे. रोहित शर्माला बाकावर बसवण्यात बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह गौतम गंभीरची भूमिका आहे. त्याला सक्तीची विश्रांती देण्यात आलीये, अशी चर्चा रंगली होती. रोहितच्या मुलाखतीमुळे या चर्चा फोल ठरल्या होत्या.
रोहितची मुलाखत छान होती म्हणत संजय मांजरेकरनं असा मारला टोमणा
संजय मांजरेकरनं स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाला की, "रोहित शर्मानं पुढे येऊन मुलाखत देण्यामागे एक खास कारण होते, असे वाटते. रोहितला बाकावर बसवणं हा एक धाडसी निर्णय आहे आणि त्याचे श्रेय गौतम गंभीरला दिले जात होते. त्यामुळे रोहित शर्मा पुढे आला आणि सर्वकाही बोलून गेला.", असे संजय मांजरेकरनं म्हटलं आहे. एवढेच नाही तर रोहितच्या मुलाखत छान होती, असे म्हणत मी आउट फॉर्म आहे, त्यामुळेच बाहेर बसण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट आवडली, असा उल्लेख करत त्याने रोहित शर्माला टोमणाही मारला.
निवृत्तीचा निर्णय तुमच्या हाती; टीम इंडियात सिलेक्शनसाठी ते बसलेत!
यावेळी संजय मांजरेकरनं रोहितसह बहुतांश खेळाडूंची खटकणारी गोष्टही शेअर केली. तो म्हणाला की, हल्ली बहुतांश क्रिकेटर माझं भविष्य मी ठरवणार असे म्हणतात. ही गोष्ट मला खटकते. तुम्ही निवृत्तीसंदर्भात तुमचं भविष्य ठरवू शकता. पण खेळाडू आणि कॅप्टनच्या रुपात भविष्य ठरवण्याचं काम तुमचं नाही. त्यासाठी निवड समिती आहे. तुम्हाला संधी द्यायची का नाही ते त्यांच्या हातात आहे. निवृत्तीचा निर्णय नक्कीच तुम्ही घेऊ शकता. पण टीम इंडियाकडून खेळण्यासंदर्भातील निर्णय हा तुमच्या हातात नाही, असे म्हणत मांजरेकर याने भारतीय कॅप्टन रोहित शर्माला सुनावल्याचे दिसून येते. निवृत्ती कधी घ्यायची? कॅप्टन्सी करावी की, नाही हे समजण्याऐवढं डोकं मला आहे. अन्य लोक (पत्रकार/मीडिया) आमचं भविष्य ठरवू शकत नाहीत, असे रोहितनं आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.