बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. नव्या दमाच्या अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर मात केली आणि अ गटात ४ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. आता एक विजय त्यांना सुपर ८ मध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. पण, या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचे वाभाडे काढले जात आहेत. प्रसिद्ध सोशल मीडिया आयकॉन IShowSpeed याचाही पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवणाऱ्यांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने त्याच्या लाइव्हस्ट्रीम दरम्यान पाकिस्तानच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आणि कर्णधार बाबर आजमची इज्जत काढली.
स्पीडने स्टार फलंदाज बाबरला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याने असे अनेक वेळा केले आहे. स्पीडने विराट कोहलीचा चाहता असल्याचे कबूल केले आहे. अमेरिकेच्या विजयावर स्पीडने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, “बाबर आजम तू घाणीत अडकला आहेस, अमेरिकेलाही हरवू शकत नाही. तू विराट कोहलीला हरवण्याची अपेक्षा कशी करतो?"
विराटचा सुपरफॅन IShowSpeed हा बाबरला ट्रोल करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याची क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
पाकिस्तानचे कॉमिक सेलिब्रिटी अन्वर मकसूद यांनीही पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली. संघाने सामना गमावला कारण त्यांना अद्याप IMF कर्ज मिळालेले नाही आणि अमेरिकेकडून पराभूत व्हाल तरच ते मंजूर केले जाईल अशी अट होती. "त्यांना हरावे लागले. आयएमएफने मंजूर केलेले कर्ज देणे बाकी आहे. आम्हाला अनुदान मिळालेले नाही. 'अमेरिकेकडून पराभूत व्हा, मग आम्ही पैसे देऊ' अशीही अट असू शकते. मी इतर कोणत्याही कारणाचा विचार करू शकत नाही,” असे मकसूद एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणाला.