मुंबई : ‘इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) केवळ तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रस्ताव शनिवारी मान्य केला. यामुळे २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील.
याआधी ईसीबीने भारतीय खेळाडूंना किमान दहा दिवस क्वारंटाईन होण्याची अट ठेवली होती. या अटीनुसार १२ जूनला क्वारंटाईन कालावधी संपणार होता. त्यामुळे केवळ सहा दिवसांचा कालावधी सरावासाठी मिळू शकला असता. १८ जूनपासून साऊदम्पटनच्या रोझ बाऊलमध्ये अंतिम सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलिया मॉडेल
मागच्या वर्षी आयपीएलनंतर नोव्हेंबरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यावेळीही तीन दिवस क्वारंटाईनचा नियम पाळण्यात आला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सराव केला. शिवाय आपसात सराव सामनेही खेळले. हाॅटेलमध्ये मात्र खेळाडू खोलीबाहेर पडू शकत नव्हते. याच मॉडेलबाबत बीसीसीआयने ईसीबीला विनंती केली. चांगल्या सरावाच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते.
दोन्ही संघांना मिळणार सूट
भारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडू १९ मेपासून सध्या मुंबईत आहेत. कुणालाही सराव करण्याची परवानगी नाही. या दरम्यान वारंवार कोरोना चाचण्या होत आहेत. कुणी पॉझिटिव्ह आढळल्यास संघाबाहेर केले जाईल. दोन आठवड्यांचा कठोर क्वारंटाईन कालावधी आटोपताच दोन्ही संघ इंग्लंडकडे रवाना होतील. दोन्ही संघांना तीन दिवस क्वारंटाईनचा नियम लागू असल्याचे ईसीबीकडून कळविण्यात आले. पुरुष संघ साऊदम्पटनकडे रवाना होतील, तर महिला संघ ब्रिस्टलला जाणार आहे. महिला संघाला इंग्लंडविरुद्ध १८ जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर वन डे आणि टी-२० मालिकादेखील खेळली जाईल.
भारताचा इंग्लंड दौरा
दिनांक कसोटी संघ
१८ ते २२ जून डब्ल्ययूटीसी न्यूझीलंड
४ ते ८ ऑगस्ट पहिली इंग्लंड
१२ ते १६ ऑगस्ट दुसरी इंग्लंड
२५ ते २९ ऑगस्ट तिसरी इंग्लंड
२ ते ६ सप्टेंबर चौथी इंग्लंड
१० ते १४ सप्टेंबर पाचवी इंग्लंड
महिलांचा इंग्लंड दौरा
सामना दिनांक स्थळ
कसोटी १६ ते १९ जून ब्रिस्टल
पहिला वनडे २७ जून ब्रिस्टल
दुसरा वनडे ३० जून टॉन्टन
तिसरा वनडे ३ जुलै वॉर्सेस्टर
पहिला टी-२० ९ जुलै नॉर्थम्पटन
दुसरा टी-२० ११ जुलै होव
तिसरा टी-२० १५ जुलै चेम्सफोर्ड