Bhuvneshwar Kumar Hattrick In Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत स्विंगचा बादशहा भुवनेश्वर कुमारनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देत कमालीची कामगिरी नोंदवलीये. टीम इंडियाकडून खेळलेल्या या गोलंदाजाने झारखंड विरुद्धच्या सामन्यात भेदक माऱ्यासह हॅटट्रिकचा डाव साधला आहे. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघाने हा सामना खिशात घातला. उत्तर प्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या भुवीनं ४ षटकांच्या कोट्यात एक निर्धाव षटक टाकले. फक्त ६ धावा खर्च करून त्याने ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
उत्तर प्रदेशच्या संघानं १० धावांनी जिंकला सामना
भुवनेश्वर कुमार देशांतर्गत स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाचं नेतृत्व करत आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्याच्या संघाने निर्धारित २० षटकात ८विकेट्सच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. यात रिंकू सिंहनं २८ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. याशिवाय प्रियम गर्गनं २५ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या संगाने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना झारखंड संघाचा डाव १९.५ षटकात १५० धावांवर आटोपला. उत्तर प्रदेश संघानं हा सामना १० धावांनी जिंकला.
पहिल्या ३ षटकात फक्त ६ धावा, अखेरच्या निर्धाव षटकात साधला हॅटट्रिकचा डाव
झारखंड विरुद्धच्या सामन्यात नव्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी करताना पहिल्या तीन षटकात त्याने फक्त ६ धावा खर्च केल्या. १७ व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याने रॉबिन मिंझ, बाल कृष्णा आणि विवेक आनंद तिवारी यांनी लागोपाठ बाद करत हॅटट्रिकचा डावा साधला. एवढेच नाही तर संघाच्या विजयाचा मार्गही सुकर केला. यंदाच्या हंगामात आकाश मधवाल, श्रेयस गोपाल आणि फेलिक्स आलेमाओ यांच्यानंतर हॅटट्रिकची कमाल करून दाखवणारा तो चौथा गोलंदाज ठरलाय. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भुवनेश्वर कुमारनं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला होता. टी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला होता. कामगिरीतील सातत्य दाखवून देत त्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
IPL मेगा लिलावात RCB नं खेळला होता मोठा डाव
आयपीएल मेगा लिलावात भुवनेश्वर कुमारवर RCB च्या संघानं मोठा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले होते. या भारतीय गोलंदाजासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं १० कोटी ७५ लाख एवढी रक्कम खर्च केलीये. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे विराटच्या टीमनं त्याच्यावर खेळलेला डाव एकदम परफेक्ट असल्याचे दिसून येते. २००९ नंतर तब्बल १५ वर्षांनी तो RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे.