दुबई : आयसीसीने अंबाती रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बंदी घातली आहे. कारण, या भारतीय क्रिकेटपटूने १४ दिवसांच्या निर्धारित कालावधीमध्ये आपल्या सदोष शैलीची चाचणी करण्यास नकार दिला आहे. रायुडूच्या गोलंदाजी शैलीची तक्रार १३ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यादरम्यान करण्यात आली होती.
आयसीसीने स्पष्ट केले की, ‘या खेळाडूने १४ दिवसांच्या निर्धारित कालावधीमध्ये आपल्या गोलंदाजी शैलीची चाचणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास त्याच्यावर ताबडतोब बंदी घालण्यात आली आहे.’ गोलंदाजी शैलीच्या वैधतेबाबत आयसीसी नियम ४.२ नुसार त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याची चौकशी होईपर्यंत त्याच्यावरील बंदी कायम राहील. वैध शैलीसह गोलंदाजी करू शकतो, हे त्याला सिद्ध करावे लागेल. रायुडू बीसीसीआयच्या सहमतीने स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो. रायुडू स्पेशालिस्ट फलंदाज आहे. वन-डे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ४९ सामन्यांत केवळ १२१ चेंडू टाकले आहेत. (वृत्तसंस्था)