Ravindra Jadeja Australian Media, Aus vs ind 4th Test MCG : चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीत असल्याने निराश झालेल्या ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळाडूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. विराट कोहलीनंतर आता जाडेजा ऑस्ट्रेलियन मीडियाच्या निशाण्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जाडेजावर आरोप केला आहे की भारतीय स्टारने पत्रकार परिषदे दरम्यान त्यांच्या प्रश्नांची अपेक्षित पद्धतीने उत्तरे दिली नाहीत.
नेमकं काय घडलं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. याआधी रवींद्र जाडेजा पत्रकार परिषदेत सहभागी झाला. चॅनल 7 च्या वृत्तानुसार, या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पत्रकारांना निमंत्रित केले गेले होते, पण त्यांना कोणतेही प्रश्न विचारू देण्यात आले नाहीत. तसेच या पत्रकार परिषदेत भारतीय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही फक्त हिंदीत दिली गेली. ऑस्ट्रेलियन पत्रकारांना जाडेजाने उत्तरे देणे फारसे महत्त्वाचे समजले नाही, असाही आरोप करण्यात आला आहे.
भारतीय पत्रकारांनी ऑस्ट्रेलियन मीडियाचे आरोप फेटाळले...
ऑस्ट्रेलियात उपस्थित भारतीय पत्रकारांनी ऑस्ट्रेलियन मीडियाचे दावे फेटाळून लावले. या पत्रकार परिषदेसाठी फक्त भारतीय मीडियालाच बोलावण्यात आले होते. इतकेच नाही तर जाडेजा सामान्यतः हिंदीतच उत्तर देतो कारण त्याला या भाषेत संवाद साधणे अधिक सोयीस्कर पडते. त्यामुळे भारतीय मीडियाने त्याला फक्त हिंदीतच प्रश्न विचारले आणि त्याने त्याच भाषेत उत्तरे दिली, असे सांगत भारतीय पत्रकारांनी जाडेजाची पाठराखण केली.
विराट कोहलीचाही झाला महिला पत्रकाराशी वाद (पाहा व्हिडीओ)
काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीचा एका महिला पत्रकाराशी वाद झाला होता. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला रवाना झाली. त्यानंतर विराटची मेलबर्न विमानतळावर एका महिला पत्रकाराशी बाचाबाची झाली. नेहमीप्रमाणे विराटला आपल्या मुलांना मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपवायचे होते. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याची छबी कॅमेऱ्यात कैद केल्याचा विराटला संशय आला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन मीडियाला ठणकावले.