नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये युएईत टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे पद सोडू शकतात. रवी शास्त्री यांचा करार या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची निवड होऊ शकते.
त्याचप्रमाणे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे देखील संघापासून वेगळे होऊ शकतात. शास्त्री यांनी बीसीसीआयच्या काही सदस्यांना याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयला देखील एक नवा समुह हवा आहे. शास्त्री यांनी २०१४ ते २०१६ या काळात संघाचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर अनिल कुंबळे यांना एक वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. २०१७ मध्ये कुंबळे यांच्या नंतर शास्त्री संघाचे प्रशिक्षक बनले.
भारताच्या गोलंदाजीला सर्वात घातक गोलंदाजी बनवण्यात अरुण यांचा मोठा वाटा आहे. श्रीधर यांनी भारतीय खेळाडूंना दर्जेदार यष्टिरक्षक बनवले. मात्र रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र याच काळात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केले. त्याचप्रमाणे, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये उत्तम खेळ केला.
बीसीसीआयच्या मते आता प्रशिक्षकांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. प्रोटोकॉलनुसार टी२० विश्वचषकानंतर बीसीसीआय नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवणार आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते राहुल द्रविड हे संघाचे नवे प्रशिक्षक बनू शकतात. राहुल द्रविड यांचा एनसीएसोबतचा करार लवकरच संपणार आहे. बीसीसआयने एनसीएच्या क्रिकेट प्रमुख पदासाठी देखील अर्ज मागवले आहेत.