Ravi Shastri Should Replace Brendon McCullum As England Head Coach : इंग्लंडचा संघ सध्या अॅशेस कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. फक्त ११ दिवसांत इंग्लंडवर पाच सामन्यांची प्रतिष्ठित कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. उर्वरित दोन सामन्यात इंग्लंडचा संघ लाज राखण्यासाठी मैदानात उतरेल. अॅशेस कसोटीतील पराभवानंतर एका बाजूला इंग्लंडचे खेळाडूंनी विश्रांतीच्या काळात केलेल्या मद्यपानचा मुद्दा गाजत असताना आता इंग्लंड क्रिकेटमध्ये भारताचे माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण
मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय
अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इंग्लंडच्या माजी क्रिकेटर मोंटी पानेसर याने मॅक्युलमला हटवण्याची वेळ आली आहे, असे मत मांडताना भारताच्या रवी शास्त्रींना इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नेमावे, असा सल्ला दिला आहे. इंग्लंडच्या संघासाठी प्रशिक्षकाच्या रुपात रवी शास्त्री हाच एक उत्तम पर्याय आहे, असा उल्लेखही इंग्लंडच्या माजी फिरकीपटूने केला आहे.
शास्त्रींना मुख्य कोच करा!
मोंटी पानेसर म्हणाला आहे की, "ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा योग्य फॉर्म्युला कोणाकडे आहे? ऑस्ट्रेलियाच्या मानसिक, शारीरिक आणि कमकुवत रणनीतीचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता? याचा विचार करावा लागेल. माझ्या मते, रवी शास्त्री यांना इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करायला हवे."
कांगारुंची शिकार कशी करायची? हे शास्त्र फक्त शास्त्रींकडेच
यावेळी इंग्लंडच्या माजी फिरकीपटूने शास्त्रींच्या प्रशिक्षक काळातील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीचाही दाखला दिला. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१८-१९ आणि २०२--२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अविश्वसनीय कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया जाऊन त्यांना पराभूत करून दाखवलं, असे सांगत शास्त्रीच कांगारुंची शिकार कशी करायची ते सांगू शकतील, अशा आशयाचे वक्तव्य मोंटी पानेसर याने केले आहे.