Join us

दक्षिण आफ्रिकेत विजयाची संधी, भारताकडे गुणवान खेळाडूंचा संघ; रवी शास्त्रींना विश्वास

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचे प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 09:42 IST

Open in App

मुंबई : ‘दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात नमवणे कधीच सोपे ठरलेले नाही. पण यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये येथे विजय मिळवण्याची क्षमता असून दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजयाची भारतीय संघाला चांगली संधी आहे,’ असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचे प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. ‘भारतीय संघाला कायम माझे समर्थन राहील,’ असेही शास्त्री यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेविषयी ते म्हणाले की, ‘भारतीय संघाकडे आपली क्षमता दाखवून देण्याची याहून चांगली संधी नसेल. विराट कोहली शानदार कर्णधार असून त्याच्याकडे गुणवान खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. दक्षिण आफ्रिकेत आपण अद्याप कसोटी मालिका जिंकू शकलेलो नाही. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या जमिनीवर नमवणे कठीण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. पण तरीही आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. नेहमीप्रमाणे भारतीय संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल.’ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे होईल. त्यानंतर दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे खेळविण्यात येईल.

द्रविड यांच्या नेतृत्वात मिळवलेला पहिला विजय

१९९२ साली डरबन येथे भारताने दक्षिण आफ्रिकेत आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. दखल घेण्याची बाब म्हणजे शास्त्री यांच्यानंतर भारताच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळलेल्या राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात खेळताना भारताने येथे २००६ साली पहिला कसोटी सामना जिंकला होता. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरवी शास्त्री
Open in App