रत्नागिरी : क्रिकेटच्या विश्वात बराच मान असलेल्या इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी रत्नागिरीचा सुपुत्र असलेल्या अविराज अनिल गावडे याला मिळाली आहे. १० मे ते ६ सप्टेंबर या चार महिन्यांत तो मिडलसेक्स संघाकडून कौंटीचे १६ आणि प्रीमिअर लीगचे १४, असे ३० सामने खेळणार आहे.वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अविराज याने शालेय स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटवला. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याने १४ व १६ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या पश्चिम विभाग संघातही स्थान मिळवले. तेव्हापासून त्याची घोडदौड सुरूच आहे.
खेळतानाची कामगिरी पाहून निवड कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या स्पर्धेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या डिव्हिजन ए चे सामने खेळतानाची कामगिरी पाहून त्याची कौंटी क्रिकेटसाठी मिडलसेक्स संघासाठी निवड झाली आहे. या सामन्यातील त्याची गुगली निवडकर्त्यांच्या पसंतीस आली असून, त्यातूनच अविराजसाठी कौंटीचे दरवाजे उघडे झाले आहेत.
चार महिन्यांचा दौरा हा तब्बल चार महिन्यांचा इंग्लंड दौरा असून, त्यात अविराज ३० सामने खेळणार आहे. सध्या तो पुणे येथील मेट्रो क्रिकेट क्लबमधून निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
अविराजने शालेय जीवनापासूनच क्रिकेटलाच आपले करिअर मानले आहे. त्यासाठी आम्ही त्याला केवळ पाठिंबा दिला; पण त्याने फक्त स्वत:च्या मेहनतीवर यश मिळवण्यात सातत्य ठेवले आहे. कौंटी क्रिकेट खेळणे हा त्याच्या करिअरमधील खूप महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने त्याच्या या निवडीबद्दल आम्हाला खूपच आनंद झाला आहे. - अनिल गावडे, रत्नागिरी (अविराजचे वडील)