Join us

रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ संघाला सलग दुसऱ्यांदा जेतेपद, सौराष्ट्रवर मात

Ranji Trophy: गतविजेत्या विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करताना जेतेपद स्वतःकडे राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:29 IST

Open in App

नागपूर : गतविजेत्या विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करताना जेतेपद स्वतःकडे राखले. विदर्भने विजयासाठी ठेवलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा संपूर्ण संघ 127 धावांवर  तंबूत परतला. आदित्य सरवटेने सर्वाधिक 6 विकेट्स घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला अक्षय वाखरेने तीन विकेट घेत उत्तम साथ दिली. सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दोन्ही डावांत अपयशी ठरला. 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाहुण्या संघाने 58 धावांत पाच फलंदाज गमावले होते. गुरुवारी अखेरच्या दिवशी सौराष्ट्रला 148 धावांची गरज होती, परंतु त्यांना 69 धावांची भर घातला आली. त्यांचे तळाचे पाच फलंदाज सकाळच्या सत्रात माघारी परतले. 

तत्पूर्वी, डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा याने 96 धावात सहा गडी बाद करीत सौराष्ट्रची स्थिती भक्कम केली होती. 8 बाद 148 असा संघर्ष करीत असताना आठव्या स्थानावर आलेल्या सरवटेने 133 चेंडूत चिवट 49 धावा करीत संघाला 200 चा आकडा गाठून दिला. मंगळवारच्या 2 बाद 55 वरुन पुढे खेळणाऱ्या विदर्भाकडून मोहित काळे याने 94 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावाला सरवटे यानेच खिंडार पाडले. पहिल्या डावातील शतकवीर स्नेल पटेल (12), हार्विक देसाई (8) आणि पुजारा (0) यांना पहिल्या पाच षटकात त्याने तंबूत परत पाठविले. 

 

 

टॅग्स :रणजी करंडकविदर्भ