नवी दिल्ली : मुंबईने पहिल्या डावात ४११ धावा केल्यानंतर तुषार देशपांडे याच्या तीन बळींच्या जोरावर शुक्रवारी येथे रणजी करंडक एलिट ग्रुपच्या अ गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेचे ६ फलंदाज ११५ धावांत तंबूत धाडताना आपली स्थिती मजबूत केली, तसेच मोठी आघाडी घेण्याकडेही वाटचाल केली आहे.
खेळ थांबला तेव्हा एन. घोष ३९ धावांवर खेळत आहे, तर त्यागीने अद्याप भोपळाही फोडला नाही. रेल्वेचा संघ अद्यापही २९६ धावांनी पिछाडीवर आहे. देशपांडेने २९ धावांत ३ गडी बाद केले. त्याला शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. तत्पूर्वी, मुंबईने पहिल्या डावात ५ बाद २७८ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि पूर्ण संघ ४११ अशी मजबूत धावसंख्या रचून सर्वबाद झाला. गुरुवारी ८० धावांवर खेळणारा सिद्धेश लाड आपल्या धावसंख्येत १९ धावांची भर घालू शकला
आणि तो शतकापासून फक्त एका धावेने वंचित राहिला. भरवशाचा फलंदाज सिद्धेश लाड याने १८९ चेंडूंत १४ चौकारांसह ९९ धावा केल्या. दुसरीकडे शिवम दुबेने ३५ धावांच्या खेळीला शतकी खेळात रूपांतरित केले. त्याने १३९ चेंडूंत १३ चौकार आणि ४ षटकारांसह ११४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ४११. (शिवम दुबे ११४, सिद्धेश लाड ९९, सूर्यकुमार यादव ८३. हर्ष त्यागी ४/८३, अवीनाश यादव ३/९९, अनुरितसिंग ३/७७). रेल्वे (पहिला डाव) : ४५ षटकांत ६ बाद ११५. (एन. घोष खेळत आहे ३९, एम. रावत ३0. तुषार देशपांडे ३/२९, धवल कुलकर्णी १/१४, एस. दुबे १/१६).