रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रोहित शर्मासह सहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा संघात समावेश असतानाही मुंबईलारणजी करंडक स्पर्धेच्या एलिट अ गटात अडीच दिवसांमध्ये जम्मू- काश्मीरविरुद्ध ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरने शनिवारी तिसऱ्या दिवशी चहापानाआधी ५ बाद २०७ धावा केल्या.
बीकेसी येथील एमसीए मैदानावर झालेल्या या सामन्यात सलामीवीर शुभम खजुरियाने ८९ चेंडूंत ५ चौकारांसह ४५ धावा करत जम्मू-काश्मीरच्या विजयाचा पाया भक्कम केला. त्याला विव्रांत शर्मा (६९ चेंडूंत ३८ धावा) व अबिद मुश्ताक (३२ चेंडूंत ३२ धावा) यांच्याकडून चांगली साथ लाभली. शम्स मुलानीने शानदार फिरकी मारा करताना खजुरिया, विव्रांत यांच्यासह अब्दुल समद (२४) व पारस डोग्रा (१५) यांना बाद करत मुंबईच्या आशा उंचावल्या. मात्र, मुश्ताकने आक्रमक पवित्रा घेत जम्मू-काश्मीरचा विजय निश्चित केला.
त्याआधी, ७ बाद २७४ धावांवरून खेळण्यास सुरू केलेल्या मुंबईचा दुसरा डाव ७४ षटकांत २९० धावांत संपला. शार्दूल ठाकूर आपल्या धावसंख्येत ६ धावांची भर घालून ११९ धावांवर बाद झाला. तनुष कोटियन १३६ चेंडूंत ६२ धावा काढून परतला. अकिब नबीने ४, युधवीर सिंगने ३ आणि उमर नाझीर मिर याने २ बळी घेतले.
दुसऱ्यांदा दणका
याआधी जम्मू-काश्मीरने २०१४ साली रणजीत मुंबईला घरच्या मैदानावर नमवले होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात जम्मू-काश्मीरने ४ गड्यांनी बाजी मारली होती. यंदा बीकेसी येथे जम्मू- काश्मीरने पुन्हा एकदा मुंबईला घरच्या मैदानावर नमवण्याची कामगिरी केली.
आता काय?
एलिट अ गटात मुंबई २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी असून, जम्मू- काश्मीर २९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मुंबई गुरुवारपासून मेघालयविरुद्ध खेळणार असून, या सामन्यात मुंबईला विजय अनिवार्य आहे.
जम्मू-काश्मीर यंदा शानदार कामगिरी करत असून, त्यांची गोलंदाजी दमदार आहे. तरी, मुंबईसाठी या सामन्यात काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. शार्दूल ठाकूर, तनुष कोटियन यांची झुंजार फलंदाजी, शम्स मुलानीची फिरकी शानदार ठरली. पुढील सामन्यात सर्वोत्तम खेळ करू.-अजिंक्य रहाणे, कर्णधार, मुंबई