मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरलाय. तो कडक फटकेबाजी करताना दिसतोय. पण दोन मॅच झाल्यावरही तो अर्धशतकापर्यंत काही पोहचलेला नाही. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनल लढतीत मैदानात उतरलेल्या सचिननं मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात लंच आधी 'फिफ्टी'चा आस्वाद घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिनची 'फिफ्टी', पण..
पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेत अंतिम सामना खेळणाऱ्या केरळचा कर्णधार सचिन बेबरी याने संयमी फलंदाजी करताना विदर्भ विरुद्ध नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. उपहारावेळी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी सचिन बेबी १०९ चेंडूचा सामना करून ६ चौकाराच्या मदतीने ५२ धावांवर खेळत होता. त्याने उपयुक्त खेळी केली असली तरी खरी 'टेस्ट' ट्विस्ट अजून बाकी आहे. कारण केरळचा संघ अजूनही १६० धावांनी पिछाडीवर आहे.
आधी आदित्य सरवटेनं साधला अर्धशतकी डाव
सचिन बेबीच्या खेळी आधी केरळच्या ताफ्यातील आदित्य सरवटे (Aditya Sarwate) याने फायनल लढतीतील पहिल्या डावात संघाकडून अर्धशतक झळकवल्याचे पाहायला मिळाले. त्याने १८५ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली. हर्ष दुबेनं त्याची बहरत असलेल्या खेळीला ब्रेक लावला. विदर्भ संघाकडून तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत दर्शन नलकांडे आणि हर्ष दुबे या दोघांच्या खात्यात प्रत्येकी २-२ तर यश ठाकूरच्या खात्यात एक विकेट जमा होती. केरळा संघानं ५ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २१९ धावा लावल्या होत्या.
विदर्भ संघानं पहिल्या डावात केल्यात ३७९ धावा
रणजी करंडक स्पर्धेच्या फायनल लढतीत केरळ संघाचा कर्णधार सचिन बेबी याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दानिश मालेवार (Danish Malewar) १५३ (२८५) आणि करुण नायर (Karun Nair) ८६ (१८८) याच्या अर्धशतकाच्या जोरावर विदर्भ संघानं पहिल्या डावात ३७९ धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. या धावांचा पाठलाग करताना सचिन बेबीच्या संघानं अर्धा संघ गमावताना संघाच्या धावफलकावर २०० पार धावा लावल्या आहेत. केरळचा संघ पहिल्या डावात आणखी किती धावांची भर घालणार त्यावरून सामना कुणाच्या बाजूनं झुकणार ते स्पष्ट होईल.