Join us

शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल

पवार हे आयसीसीचे अध्यक्ष असताना भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पवार हे आयसीसीमध्ये नसेल तरी त्यांची पॉवर अजूनही आयसीसीमध्ये कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:12 IST

Open in App

पुणे : बीसीसीआय आणि आयसीसीसारख्या मोठ्या क्रिकेट संघटनांचे अध्यक्षपद शरद पवार यांनी यापूर्वीच भूषवले आहे. पण आज पवार यांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेटचा सामना रंगला होता. बऱ्याच दिवसांनंतर पवार हे क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. पण क्रिकेटच्या दृष्टीने 'हे' महत्वाचे पाऊल उचलले गेल्याची चर्चाही यावेळी रंगत आहे.

पवार हे आयसीसीचे अध्यक्ष असताना भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पवार हे आयसीसीमध्ये नसेल तरी त्यांची पॉवर अजूनही आयसीसीमध्ये कायम आहे. कारण पवार यांच्या जवळचे समजले जाणारे शशांक मनोहर आता आयसीसीचे हंगामी अध्यक्षपद भूषवत आहेत.

जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटमध्ये पैसा आणला त्यामुळे त्यांना डॉलरमिया, असे म्हटले जात होते. पण दालमिया यांच्यानंतर क्रिकेट विश्वात पवार यांची आपले एक अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळे अजूनही क्रिकेटचे नाव काढल्यावर सर्वांनाच पवारांची आठवण आल्यावाचून राहत नाही.

पवार यांनी क्रिकेटच्या विकासाबरोबर प्रसारामध्येही महत्वाची भूमिका बजावली, असे म्हटले जाते. या धर्तीवरच पवार यांनी बारामतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बांधले होते. या स्टेडियमवर आज पहिला रणजी सामना खेळला गेला. त्या निमित्ताने या स्टेडियमचे उद्घाटन पवार यांनी आज केले. आजपासून बारामतीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड हा रणजी सामना सुरु झाला आहे.

या स्टेडियमचे उद्घाटन झाल्यावर पवार म्हणाले की, " बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे."

टॅग्स :शरद पवारआयसीसीबीसीसीआयबारामतीरणजी चषक 2017