Ram Mandir Ayodhya | अयोध्या: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गर्भगृहात स्थापित केलेली रामललाची मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे. मंदिर ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण दिले जात आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. मूर्तीप्रमाणेच गर्भगृहही तयार आहे, मात्र संपूर्ण मंदिराच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागू शकतात.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादला देखील राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे. खुद्द प्रसादने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, स्वप्नपूर्ती झाली असल्याची भावना व्यक्त केली आहे.
स्वप्नपूर्ती...
व्यंकटेश प्रसादने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, "माझ्या हयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा ही एक आशा आणि इच्छा होती. अखेर तो क्षण आला आहे. २२ जानेवारीला केवळ अभिषेकच होत नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणात सहभागी होण्याचे मोठे भाग्य मला लाभले आहे. आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री राम."
अलीकडेच अयोध्येतील राम मंदिरासाठी पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड केली. दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठाचे विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून २० जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक मोहित आहेत. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हे सीतापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी ते तिरूपतीला गेले. आचार्यची पदवी घेतल्यानंतर ते पीएचडीची देखील तयारी करत आहेत. अशातच त्यांनी राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्यांची निवड झाली.
Web Title: Ram Mandir Ayodhya Former Indian team player Venkatesh Prasad has been invited for the inauguration of Ram Mandir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.