Join us

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा!

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध नेहमी ताणलेले असल्यामुळे उभय देशांतील क्रिकेट सामनेही बंद झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 16:14 IST

Open in App

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध नेहमी ताणलेले असल्यामुळे उभय देशांतील क्रिकेट सामनेही बंद झाले आहेत. त्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मत व्यक्त केलं आहे.

14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या आणि 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरातून तीव्र नाराजी प्रकट करण्यात आली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खानचा फोटो झाकला होता. तसेच पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर शुक्ला म्हणाले,''इम्रान खानचा फोटो झाकण्यात आला, पीसीएलचे प्रक्षेपण थांबवण्यात आले, हे सर्व अपेक्षित आहेच.''

पण, क्रिकेट व राजकारण यांची सरमिसळ करू नये अशी अपेक्षा शुक्ला यांनी व्यक्त केली. त्याचवेळी शेजारील राष्ट्राने दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे थांबवावे आणि त्यानंतर भारतासोबत क्रिकेट मालिकेबद्दल बोलावे, असा दमही त्यांनी भरला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना होणार आहे. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यानही भारत आणि पाकिस्तान यांच्यातला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होऊ नये अशी मागणी झाली होती, परंतु त्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

यावेळीही भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर शुक्ला म्हणाले,''वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्ताविरुद्ध खेळावे की न खेळावे याबाबत मी आता काहीच सांगू शकत नाही. आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.''

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९बीसीसीआय