Join us

ना पुजारा, ना सर्फराज... विराट कोहलीच्या जागी टीम इंडियात 'या' स्टार फलंदाजाने मारली बाजी

विराटने वैयक्तिक कारण देत पहिल्या दोन कसोटींमधून घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 09:59 IST

Open in App

Virat Kohli , IND vs ENG : भारतीय संघ उद्यापासून इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर २५ जानेवारी ते ११ मार्च या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताकडून पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून विराट कोहलीने माघार घेतली आहे. त्यानंतर त्याचा बदली खेळाडू कोण असेल यावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अनुभवी चेतेश्वर पुजारा किंवा आक्रमक सर्फराज खानच्या नावाची चर्चाही झाली. पण अखेर बदली खेळाडू म्हणून मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारला (Rajat Patidar) भारतीय संघात स्थान मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.

रजत पाटीदारला भारतीय संघात विराटच्या जागी खेळायची संधी मिळणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. रजत आधीच हैदराबादमध्ये भारतीय संघात सामील झाला आहे आणि काल संध्याकाळी BCCI च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यालाही तो उपस्थित होता. कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांतीची विनंती केली होती, त्यानंतर सर्वांच्या नजरा निवड समितीकडे लागल्या होत्या. रजत पाटीदार व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा आणि सर्फराज खान या स्थानाचे दावेदार होते. जवळपास ८ महिन्याच्या दुखापतीनंतर परतलेला आक्रमक फलंदाज पाटीदार हा भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांची एकमताने केलेली निवड असल्याचे मानले जात आहे.

मध्य प्रदेशचा हा फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळण्याबाबत अनुभवी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये संयमी पण तितकाच प्रभावी फलंदाज म्हणून तो ओळखला जातो. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर दबाव आणण्याची कला त्याला अवगत आहे. भारत 'अ' संघाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मैत्रिपूर्ण कसोटी सामन्यात १५१ धावांची खेळी केली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीचेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघ