Join us

Sanju Samson IPL 2022 : दिल्लीच्या रस्त्यांवर झालेला संजू सॅमसनच्या आई-वडिलांचा अपमान; एका रात्री सोडलं होतं शहर!

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय कुटुंबीयांना दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:36 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय कुटुंबीयांना दिले. त्यांच्या मदतीमुळे व भक्कम पाठिंब्यामुळेच आज मी क्रिकेटपटू बनू शकलो, असे सॅमसन म्हणाला. पण, आपल्यामुळे कुटुंबीयांना अनेक टोमणे ऐकावे लागले आणि अपमानही सहन करावा लागला. ज्यांना मी क्रिकेटपटू बनेन असा विश्वास नव्हता त्यांनी हा अपमान केला, असा मोठा खुलासा संजू सॅमसनने केला.  

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने हा सर्व प्रसंग सांगितला. ''माझे आई-वडील माझी क्रिकेट किट बॅग घेऊन माझ्यासोबत यायचे. बॅगचं खूप वजन असायचं. बस स्टॉपजवळ ते माझ्यासोबत उभे राहायचे, तेव्हा मागून त्यांना टोमणे मारले जायचे... बघा सचिन आणइ त्याचे वडील चालले आहेत. हा बनणार तेंडुलकर?; त्यांनी असे अनेक टोमणे सहन केले,'' गौरव कपूरच्या Breakfast with Champions या कार्यक्रमात संजूने हे सांगितले. २७ वर्षीय संजूवर कुटुंबीयांनी नेहमी विश्वास दाखवला आणि त्याच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. भारतीय संघात खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने मेहनत घेतली. त्याचा भाऊ नेहमी म्हणायचा, की तू भारतीय संघाकडून खेळणार.'' आई-वडील व विशेषतः भावाने दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी भारतीय संघाकडून खेळू शकलो, असे संजू म्हणाला. 

''माझे वडील पोलिसांच्या फुटबॉल टीमकडून खेळायचे. माझं क्रिकेटही दिल्लीतच सुरू झाले. मी ५-६ वर्षांचा असताना ते मला पहिल्यांदा फिरोजशाह कोटला मैदानावार घेऊन गेले होते. जिथे मी लेदर बॉलवर प्रॅक्टिस केली होती. क्रिकेटपटू बनवण्यासाठी कुटुंबियांनी मला त्रिवेंद्रमला पाठवले आणि हा निर्णय त्यांनी एका रात्री घेतला. २-३ वर्षांनंतर वडिलांनी निवृत्ती घेतली आणि तेही त्रिवेंद्रमला आले,''असे संजूने सांगितले.  

२०१५मध्ये संजूने भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, त्याला पुढील संधीसाठी ५ वर्ष वाट पाहावी लागलीय त्याने १३ ट्वेंटी-२० व १ वन डे सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले.  

टॅग्स :आयपीएल २०२२संजू सॅमसनराजस्थान रॉयल्स
Open in App